संख,संकेत टाइम्स : संख(ता.जत)येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करा,अशी मागणी नूतन उपसरपंच सुभाष पाटील यांनी जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना सुरु आहे.तात्पुरत्या स्वरूपात उपकेंद्राचे समुदाय अधिकारी आठवड्यातून एक दिवस येतात.यापुर्वी आरोग्य अधिकारी डॉ.सुशांत बुरुकुले यांच्याकडे कार्यभार होता,मात्र त्यांची ११ महिन्याची सेवा संपली आहे.त्यामुळे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे.
संख प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सहा उपकेंद्रे व १७ गावांचा समावेश आहे.मुचंडी,दरीबडची, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी,खंडनाळ, गोंधळेवाडी, आसंगी (जत),आसंगी तुर्क,पांडोझरी, अंकलगी,तिल्याळ,संख,दरीकणूर,धुळकरवाडी,
लमाणतांडा(दरीबडची),मोटेवाडी या गावाचा समावेश आहे.संखचे प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श आनंदीबाई जोशी पुरस्कारान गौरविले आहे.अशा केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.रुग्णांना महागड्या खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत.त्यामुळे तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.