मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत घोषणा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखानाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भरत गोगावले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल. मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.




