जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या जिल्हातील फिल्ड ऑफिसरकडे जास्तीत जास्त 5 ते 6 सोसायटीचा कारभार असताना डफळापूर आणि बाज सोसायटीच्या फिल्ड ऑफिसरकडे मात्र 11 सोसायटीचा कारभार आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील डफळापूर व बाज शाखेस स्वतंत्र फिल्ड ऑफिसर नेमण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाकडे केली आहे.
ढोणे म्हणाले,जत तालुक्यातील पश्चिम भागात म्हैशाळ योजनेचे पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे.त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात शेती कर्ज, पीक कर्ज,मध्यम मुदत,दीर्घ मुदत कर्ज घेण्यासाठी सेवा सोसायटी यांच्याकडे अर्ज करत आहेत,पण एकाच फिल्ड ऑफिसरकडे ११ सोसायटीचा कारभार असल्याने प्रत्येक सोसायटीकडे लक्ष देता येत नसल्याने त्यांना वेळेवर कर्जपुरवठा होत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
पश्चिम भागात एकूण ११ सोसायटी असून डफळापूर शाखा अंतर्गत ६ सोसायट्या आहेत.त्यात डफळापूर 2, शिंगणापूर, मिरवाड, जिराग्याळ, एकुंडी आणि बाज शाखा अंतर्गत ५ सोसायट्या बाज गावातील २ सोसायटी, अंकले, डोर्ली, बेळूंखी आदी सोसायट्या आहेत.
डफळापूर आणि बाज शाखेसाठी एकच फिल्ड ऑफिसर असल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शेतकरी सभासदांच्या आणि बँकेच्या सोयीसाठी तातडीने जत तालुक्यातील डफळापुर आणि बाज शाखेसाठी स्वतंत्र फिल्ड ऑफिसर नेमून जत तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांची सोय करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी बँकेच्या प्रशासनाशी व संचालक मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.