नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व जपणारे संजय घोडावत

0

संजय घोडावत हे नाव प्रथम माझ्या कानावर पडले ते 1998 साली. त्यावेळी उद्योग व्यवसायामध्ये त्यांचे नाव आदराने घेण्यात येऊ लागले होते. मीही बी.इ चे माझे शिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागलो होतो. परंतु नोकरीत मन रमत नसल्यामुळे मी आय टी व्यवसायात पदार्पण करायचे ठरवले. ‘विवेका सिस्टिम्स’ या नावाने व्यवसाय सुरू केला. या निमित्ताने संजयजी घोडावत यांच्याशी भेट झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर पडला आहे.संजय घोडावत या परीसाचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला आणि मी आरपार बदलून गेलो. त्यांची व्यवसायातील कौशल्ये, आचार- विचार या सगळ्यांचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. तसाच तो त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांच्या वरच राहतो.

 

संजयजी घोडावत यांचा उद्योग व्यवसायातील 30 वर्षाचा गौरवशाली जीवनप्रवास मी खूप जवळून अनुभवलाय कारण त्यांचा मी सहप्रवासी राहिलोय. संजय घोडावत यांच्या कर्तुत्वाचा प्रवास त्यांच्या शालेय जीवनापासूनच झाला. याबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी नेहमी सांगत असतात. शालेय जीवना पासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण होते. हायस्कूल आणि कॉलेज जीवनामध्ये देखील त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. आपल्या आई-वडिलांना दैवत मानून सुरुवातीला संजय घोडावत यांनी उद्योग समूहाची उभारणी केली. हे करत असताना अनेक वेळा त्यांना अपयशाला तोंड द्यावे लागले परंतु न डगमगता, न खचता,सकारात्मकतेने त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाची वाटचाल सुरू ठेवली. बऱ्याच वेळा आर्थिक तोटा सहन करावा लागला. पण यावरही त्यांनी मात केली आणि आपला प्रवास सुरू ठेवला. केवळ एकाच व्यवसायावर विसंबून न राहता त्यांनी वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू केले. याबाबत त्यांचे म्हणणे असे आहे, की आपल्या बिजनेस बास्केटमध्ये वेगवेगळी उत्पादने असायला हवीत. त्याची उभारणी करायला हवी. हे करत असताना आपली नीतिमत्ता आणि ग्राहकांचे हित दोन्ही महत्त्वाचे असते. हे जपले गेले तरच आपल्याला यश मिळू शकते.

 

गेल्या 30 वर्षात उद्योग व्यवसायाबरोबरच संजयजी घोडावत यांनी चांगल्या विचारांची माणसे आपल्या सोबत जोडली. ते नेहमी म्हणतात, की माझ्यासोबत चांगली माणसं आहेत, म्हणून हा उद्योग समूह मोठा झाला. आजही सुरुवातीपासून त्यांच्यासोबत काम करणारी माणसे कंपनीत त्यांच्यासोबत आहेत. आणि हेच माझ्या यशाचे रहस्य आहे हे अभिमानाने संजय घोडावत सांगतात. आपल्या सोबत चांगल्या विचारांची माणसे असतील तर आपले विचारही चांगले बनतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

संजयजी घोडावत यांनी स्वतःला नेहमी अपडेट ठेवले आहे. नव्या उद्योग व्यवसायात पदार्पण करत असताना त्यांनी स्वतः त्याचा पहिला अनुभव घेतला आहे. स्टार एअरलाईन ची सुरुवात करण्याअगोदर त्यांनी पायलट चे शिक्षण अमेरिकेमध्ये पूर्ण केले. स्वतः वैमानिक झाले आणि मग त्यांनी स्टार एअरलाईन ची सुरुवात केली. त्यांचे ध्येय नेहमी आकाशाला गवसणी घालण्याचे राहिले आहे. त्यासाठी अहोरात्र ते कष्ट घेतात. योग्य नियोजन करून प्रामाणिक प्रयत्न करतात. हे करत असताना ते नेहमी म्हणतात,की आपले हात कितीही आकाशाला टेकले तरी पाय नेहमी जमिनीवरच ठेवायला हवेत. आपल्या आयुष्यात अहंकार, गर्व याला थारा देऊ नये,अन्यथा आपल्याला अपयश पचवणे अवघड होते. अशी तत्त्व घेऊन चालताना संजयजींनी आपल्या सोबत अनेक लीडर बनवले. म्हणून त्यांना लीडर बनवणारा लीडर असे म्हटले जाते. स्वतः सोबत इतरांच्या मध्येही सकारात्मकता निर्माण करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.अपयशाला न डगमगता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्याची त्यांची क्षमता अतुलनीय आहे. उद्योगधंद्याच्या उभारणीत टीमवर्क खूप महत्त्वाचे आहे असे ते सातत्याने सांगतात. त्यांच्याकडे माणसं पारखण्याची वेगळी दृष्टी आहे. आपल्या सोबतच्या माणसांना ‘झिरो टू हिरो’ करण्याची किमया त्यांच्यात आहे.

उद्योग व्यवसाय बद्दल आपले मत मांडताना संजयजी घोडावत म्हणतात, की केवळ मेट्रो सिटी मध्येच उद्योगधंदे उभा राहिले कि ते यशस्वी होतात असे नाही.आपल्या पंचक्रोशीत उभा केलेला हा उद्योग खरे तर खेडे गावांचा विकास करणार आहे. येथील हातांना काम मिळाले की खेड्यांचा विकास होईल आणि उद्योगधंद्यांचीही भरभराट होईल. येथील खेड्यांचा विकास व्हावा यासाठी माझे उद्योगधंदे हे या पंचक्रोशीतच उभे केले आहेत. हे करत असताना संजयजींनी आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. यासाठी त्यांनी संजय घोडावत सोशल फाउंडेशन ची स्थापना केली. त्याद्वारे आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. ब्लड बँकेची स्थापना, महापुर, कोरोना काळातील आरोग्याची आणि अन्नधान्याची केलेली मदत,पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, ज्येष्ठांसाठी माऊली केअर सेंटरची उभारणी, गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेली मदत, अंध विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शाळा ही त्यांच्या सामाजिक कार्याची साक्ष देतात.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्यांनी सुशीला दानचंद घोडावत चारिटेबल ट्रस्टची स्थापना केली. याद्वारे इंटरनॅशनल स्कूलची उभारणी केली.या भागातील विद्यार्थ्यांना उत्तम असे इंग्रजीचे शिक्षण मिळावे आणि येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमवावे यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. संजय घोडावत पॉलिटेक्निक असो किंवा संजय घोडावत विद्यापीठ याद्वारे सातत्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी नवनव्या संकल्पनांचा विचार ते करत असतात. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण येथे देण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगामध्ये 100 शाळांच्या मध्ये इंटरनॅशनल मीडियम स्कूल आणि जागतिक 200 विद्यापीठांमध्ये संजय घोडावत विद्यापीठ आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या मार्फत विद्यार्थ्यांना चांगल्या अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना अशा सोयी सुविधा देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते योग्य निर्णय घेतात. योग्य निर्णय घेण्याची दैवी देणगी त्यांना लाभली आहे. आपले उद्योगधंदे, संस्था कशा नावा रूपाला येतील यासाठी ते सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतात. सध्या घोडावत उद्योग समूहामध्ये 10 हजार कामगार तर विद्यापीठामध्ये 16 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आय.टी क्षेत्रात होत असलेले वेळोवेळीचे बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी संजयजी सर्वांना प्रेरित करतात. यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Rate Card

गेली 30 वर्षे मी त्यांच्यासोबत आहे. सुरुवातीला व्यवसायानिमित्त माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझ्यातील मॅनेजमेंट स्किल ओळखून घोडावत पेट्रोलिंक्स ची जबाबदारी दिली. शैक्षणिक संस्था उभी करायचे ठरवले त्यावेळेस नेतृत्व गुण ओळखून माझी विश्वस्त म्हणून नियुक्ती केली. माझ्यासारख्या अशा सर्वसामान्य माणसांना संजय घोडावत यांचा परीस स्पर्श लाभतो आणि आयुष्य सोन्यासारखे होऊन जाते. त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या सहवासाने अनेकांचे आयुष्य सोनेरी झाले आहे. अशा या प्रभावी नेतृत्वाला, कर्तुत्वाला, दातृत्वाला 58 व्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..! इतरांचे आयुष्य सोनेरी करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाचे तेज सोन्या इतकेच अखंड राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

विनायक भोसले

विश्वस्त

संजय घोडावत विद्यापीठ,कोल्हापूर

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.