तासगाव : आपल्या पत्नीवर घरी कोणी नसताना येऊन जबरदस्ती करीत असल्याप्रकरणी कामगार पती – पत्नीने मिळून मालकाचा काटा काढल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे चार दिवसांपूर्वी तासगाव – निमणी रस्त्यालगत विहिरीत खून करून टाकलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटली असून या खुनाचाही छडा लागला आहे.
सुनील ज्ञानेश्वर राठोड (वय 26) त्याची पत्नी पार्वती ज्ञानेश्वर राठोड (वय 26) दोघेही रा. येलगोड, ता. सिंघगी, जि. विजापूर अशी अटक करण्यात आलेल्या पती – पत्नीची नावे आहेत. तर हरी येडूपल पाटील, रा. मंगसुळी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, हरी पाटील यांचे जेसीबी मशीन आहे. हे मशीन तासगाव नगरपालिकेच्या कामावर सुरू होते. या मशीनवर सुनील राठोड हा ऑपरेटर म्हणून काम करीत होता. सुनील व त्याची पत्नी तासगाव – चिंचणी रोडवरील के. के नगर येथे रहायला होते. दरम्यान, जेसीबी मालक हरी पाटील हा सुनील घरी नसताना त्याच्या घरी जात होता. त्याच्या पत्नीशी लगट करून तिच्यावर जबरदस्ती करीत होता. त्यामुळे सुनील याने मशीनवर कामाला जाणे बंद केले होते.
त्यामुळे मशीन मालक हरी पाटील हा 8 जून रोजी सुनीलच्या केकेनगर येथील घरी आला. यावेळी सुनील व हरी यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. यातून सुनील व त्याची पत्नी पार्वती यांनी हरीच्या डोक्यात काठी, खोऱ्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात हरीचा खून झाला.
त्यानंतर हरीचा मृतदेह सुनील व पार्वती यांनी दोन दिवस घरातच ठेवला. त्यानंतर दोघांनी मिळून हा मृतदेह प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा दृष्टीने तासगाव – निमणी रोडवरील एका विहिरीत फेकून दिला.
खुनानंतर सुनील हा जेसीबी घेऊन पुण्याकडे पसार झाला. दरम्यान, विहिरीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने हलवली. वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू झाला. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, चडचण, अथणी येथे पथकांनी तपास केला. यावेळी हरी पाटील यांची माहिती लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे गतिमान केली.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सुनील हा जेसीबी मशीन घेऊन पुण्याच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या पथकाने सुनील याला ताब्यात घेतले. त्यानंतर सुनीलच्या पत्नीलाही ताब्यात घेतले.