अनैतिक प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा खून | संशयित मातेसह प्रियकर ताब्यात
सांगली : लेंगरे (ता.खानापूर) येथे अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.निर्दयी मातेने आपल्या ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव केला होता. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर विटा पोलिसांकडून कसून तपास करून निर्दयी माता व तिच्या प्रियकराने केलेला खरा प्रकार समोर आणला आहे.
याप्रकरणातील संशयित ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,लेंगरे येथील ज्योती लोंढे या विवाहितेचे तेथील रूपेश घाडगे यांच्याशी गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत.ज्योती हीचे पुर्वी लग्न झाले असून तिला शौर्य हा ६ वर्षाचा मुलगा आहे.ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता.
त्यामुळे दोघांनी शौर्यचा काटा काढायचे ठरवले होते.६ मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने पोलीसात दिली.तर दुसरीकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत फेकून दिले.अपहरणाचा गुन्हा दाखल होताच विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.दरम्यान एका विहिरीत चिमुकला शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळून आला.हा प्रकार संशयास्पद वाटल्याने विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पोलीस तपासात पुढे आली.
संशय बळावल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन दोघाकडे कसून चौकशी केली.त्यांनी चिमुकल्या शौर्यचा खून केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडुरंग कनेरे आणि पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला,असून पुढील तपास सुरू आहे.