कर्नाटकातील विजयाचा सांगलीत साखर वाटत फटाक्याची आतषबाजीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला.कर्नाटकात सत्तेत असलेले ४० टक्के कमिशनचं भाजप सरकार सामान्य जनतेने लाथाडलेलं आहे, आणि राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने काँग्रेसचे तब्बल १३६ वर आमदार विजयी करत सरकार बहुमताने सत्तेवर आणलेले आहे,हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे, अशी आंनदी प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निकालावर बोलताना दिली आहे.
पाटील पुढे म्हणाले, गेली ४ वर्षे भाजप हा पक्ष कर्नाटकमध्ये सत्तेवर होता, तिथे त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या कारकीर्दीत राज्य विकासापासून मागे राहिले आहे,त्यामुळे जनतेचा होऊ शकला नाही.म्हणूनचं कर्नाटकात भाजपचे कमळ कोमेजून गेले आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जास्तीत जास्त जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा काढली होती. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि त्यामुळे वातावरण निर्मिती चांगली तयार झाली होती. काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली. राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांनी विविध भागात सभा घेऊन जनतेचा विश्वास निर्माण केला. या निवडणुकीचा महाराष्ट्रातसुद्धा मोठा परिणाम यापुढील काळात दिसून येईल. अन्य काही राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही काँग्रेसच्यादृष्टीने एक नवे पर्व सुरू होईल,हे निश्चित असल्याचेही मत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगलीतील काँग्रेस भवनसमोर जल्लोष
कर्नाटकातील काँग्रेसचा मोठ्या विजयाचा सांगलीतील काँग्रेस भवनसमोर कॉग्रेसच्या वतीने सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. गुलालाची उधळण केली, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी केली तसेच साखर वाटण्यात आली.