जत: जत तालुक्यातील कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेने ग्रामपंचायत व विविध संस्थांच्या सहकार्यानी खंडोबा बिरोबा देवस्थान परिसरात ८०० वृक्षांची लागवड केली. उन्हाळी सुटीत या वृक्षाचे विद्यार्थिनी करीत संगोपनात आहेत.
तालुक्यातील हा अनोखा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.यापूर्वी शाळेने ‘माझी भाकरी’ उपक्रम राबविला होता. या वृक्ष लागवडीमुळे असहा उकाडा आणि उष्णतेच्या चटक्यांपासून पशु-पक्षी तसेच ग्रामस्थांनाही दिलासा मिळत आहे. झाडांना पाणी देणे तसेच त्यांची देखभाल करणे हे काम मुली करीत आहेत.उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांची बदली होऊनही त्यांनी या उपक्रमाकडे लक्ष दिले आहे.सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी आहे.
विद्यार्थी,विद्यार्थिनी यांना वृक्ष लागवडीबद्दल आस्था आहे. त्यामुळे वृक्षसंगोपन चांगल्या पध्दतीने सुरू आहे. यापूर्वी राबवलेले उपक्रम शाश्वत स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,असे उपक्रमशील शिक्षकभक्तराज गर्जे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून यापूर्वी राबवलेले उपक्रम शाश्वत राखण्याचा त्यांचा मानस आहे. वैभवी धडस,शारदा कुलाळ, काजल लेंगरे,स्वप्नाली कारंडे, सचिन टकले या विद्यार्थिनींनी एकत्र येत झाडांच्या देखभालीचे काम सुरू ठेवले आहे.