सांगली : अर्धवट राहिलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या बिळूर (ता. जत) कालव्याचे काम त्वरित सुरु करून पाणी सोडावे या मागणीसाठी बिळूरसह आसपासच्या ८ गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
बिळूर व परिसरातील गुगवाड, वज्रवाड, खिलारवाडी, एकुंडी, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, मिरवाड या गावांना हा कालवा वरदान ठरणार आहे.मात्र कालव्याचे काम डफळापूर हद्दीत अर्धवट राहिले आहे.हा कालवा पूर्ण व्हावा, यासाठी ग्रामस्थ दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.उन्हाच्या तीव्रतेने आणखीन कठीण परिस्थिती बनली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,डफळापूर हद्दीत कालव्याचे काम फक्त १०० ते २०० फूट मध्ये रखडले आहे, त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकत नाही.जवळचं डोळ्यांसमोर पाणी असतानाही पाणी मिळत नसल्याने आम्हाला वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन व योजनेच्या व्यवस्थापनाला यापूर्वी सातत्याने निवेदने दिली आहेत, पण सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.त्याचबरोबर वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार ही गावे ‘अतिशोषित’ वर्गवारीत येतात.
त्यामुळे तेथे विहीर खोदण्यावर शासनाचे निर्बंध आहेत.त्यामुळे सिंचन योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही.कालव्याचे अर्धवट राहिलेले काम अगदी काही तासांत पूर्ण होऊ शकते, पण प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. काम तातडीने पूर्ण करुन ओढे, नाल्यांत पाणी सोडल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
आंदोलनात बसगोंडा नाईक, मलगोंडा हेळकर, मलगोंडा कोट्टलगी, प्रकाश बिरादार, चिदानंद चौगुले, बाबाण्णा नाईक, श्रीमंत गुडोडगी, शिवपूत्र नाईक, प्रकाश हेळकर, श्रीशैल कुल्लोळी, रायगोंडा पाटील आदीसह ५० वर पदाधिकारी सहभागी झाले आहेत.