उमदी : जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. जूनमध्ये पाऊसच पडलेला नाही. परिणामी, उडीद- मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. आठ दिवसांत पेरणी न झाल्यास हा पेरा करता येणार नाही.
जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात ही नगदी पिके घेतली जातात.पुर्व भागात खरिपाचे म्हणून ओळखले जातात. हा भाग दुष्काळी असल्याने त्यांची मदार पावसावरच असते.रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रताही प्रचंड वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.
शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात केली नाही. सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका,बाजरी या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. जत,कवठेमहाकांळ तालुक्यांत उडदाचे क्षेत्र मोठे असते. मात्र, पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
टंचाईच्या झळा तीव्र होणार
पावसाळा आणखी लांबल्यास टँकरच्या संख्येत वाढ होईल.शेतकरी पावसाच्या भरवशावर उडीद, मूग, तूर, बाजरी, सोयाबीनची पेरणी करतात. मात्र, पाऊस लांबल्याने बियाणे खरेदीसाठी येण्याचे प्रमाण तुरळक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत दुकानदारही पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस झाला तरच बाजारपेठेत उलाढाल होईल.सुनिल सावळे,कृषी केंद्र मालक