पांडुरंग हे विष्णुचा अवतार आहे.त्यामुळे ते संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत.परंतु महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी विष्णू हे पांडुरंगाच्या(विठ्ठलाच्या)रूपा
कारण महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या सारख्या महान संतांनी संत परंपरेचा वारसा जोपासला आहे.कोणी लहान नाही,कोणी मोठा नाही, सगळे समान व सारखे अशी समतेची भावना सर्व संतांनी लोकांच्या मनात रूजवीली आहे.त्यामुळेच आज संपूर्ण भारतात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते.आजही संपूर्ण महाराष्ट्रात संतांचा वारसा दिसून येतो. ही महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे.असेही म्हणतात की आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरूवात होते व आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रास्थ होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वराची, देहू वरून तुकारामाची, त्र्यंबकेश्वर येथुन संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची,तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात.या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात.एकादशीच्या दिवशी भाविक पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात व तुळस वाहून विठ्ठलाची पुजा-अर्चना करतात.विठ्ठल म्हणजे साक्षात विष्णूचाच अवतार आहे.
विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवुन संपूर्ण भाविक मानवजातीच्या कल्याणासाठी आणि येणारे विघ्न दूर व्हावे यासाठी साकडे घालतात व राज्य सुजलाम सुफलाम होण्याची मनोकामना करतात. पौराणिक कथांमध्ये सुध्दा आषाढी एकादशीचा उल्लेख दिसून येतो.मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून त्यांना प्रसन्न केले व मला मरण येणार नाही असा वर शंकरजी जवळुन मागुन घेतला.अशा परिस्थितीत मृदुमान्य राक्षसाने संपूर्ण देवतांवर विजय मिळविण्याचा निश्चय केला.अशा परिस्थितीत मृदुमान्य राक्षसाने ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांचा शोध घेणे सुरू केले.अशावेळी ब्रम्हा, विष्णू, महेश एका गुहेत तीन दिवस लपून बसले.या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासुन एकादशी देवता उत्पन्न झाली व तिने मृदुमान्य राक्षसाचा वध केला.हीच ती आषाढी एकादशी होय.या दिवसांपासून चातुर्मास सुरू होतो.असा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये पहायला मिळते.विदर्भाचे पंढरपूर म्हणून धापेवाड्याची २८२ वर्षांची ओळख आहे.आजही आपल्याला आषाढी एकादशी पासून तर गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत (आखाडीच्या दुसऱ्या दिवसांपर्यंत) धापेवाड्याला भव्य यात्रा दिसून येते.धापेवाड्याचे पांडुरंगाचे परमभक्त श्रीसंत कोलबाजी महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करून पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे.त्यानंतर वृद्धापकाळाने कोलबाजी महाराज पंढरीची वारी करून शकले नाही याची खंत त्यांना वाटु लागली.ते विठ्ठलाचे परमभक्त असल्याने पांडुरंगाला आपल्या परमभक्ताची चिंता वाटायला लागली.
अशा परिस्थितीत पांडुरंग श्रीसंत कोलबाजी महाराज यांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने सांगितले की हे माझ्या परम भक्ता तु माझ्या पर्यंत येवू शकत नाही हे मला समजते.त्यामुळे मी स्वतः तुझ्या भेटीसाठी धापेवाड्याला येत आहे.असे पांडुरंगाचे बोलने ऐकुण श्रीसंत कोलबाजी महाराजांनी स्वतःला धन्य मानले व पांडुरंग धापेवाडास्थित चंद्रभागेच्या काठाच्या विहीरीत स्वयंभू विठ्ठलमूर्तीच्या रूपात गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या प्रतिपदेला प्रकट झाले. अशी आख्यायिका आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात एकादशीच्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धापेवाड्याला साक्षात पांडुरंग येतात.त्यामुळे धापेवाड्याला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भक्तांची भव्य यात्रा आपल्याला पहायला मिळते.देवतांवर विजय मिळविण्यासाठी मृदुमान्य राक्षसाने ब्रम्हा,विष्णू, महेश यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.अशा परिस्थितीत हे तिन्ही देवता एका गुहेत तीन दिवस लपून बसले.यांच्या श्वासातून एकादशी देवता निर्माण झाली व मृदुममान्य राक्षसाचा वध केला.
असे पुराणात आहे.हीच गोष्ट आज आपल्याला लागू होते.आज पृथ्वीवरील संपूर्ण जीवजंतूसाठी श्वास (ऑक्सिजन) ची जोपासना करणे गरजेचे आहे यासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे.आज महाराष्ट्र अनेक दऱ्या, डोंगर व बंजार जमीन आहे.या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.आपण पहाल की करोना काळात संपूर्ण जग ऑक्सिजनसाठी धडपडत होते.म्हणजे ऑक्सिजनला किती महत्त्व आहे ते आपल्याला करोनाने चांगल्याप्रकारे शिकविले.याकरीता पृथ्वीला व पृथ्वीवरील जीवसृष्टीला वाचविण्यासाठी सावधगिरीचे उपाय म्हणून घर तीथेच झाड,बंजार जमीन, गडकिल्ले या संपूर्ण ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी.यासाठी मुख्यत्वेकरून सरकारने, सर्वसामान्यांनी,सरकारी अधिकाऱ्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन वृक्षलागवडीला महत्त्व दिले पाहिजे.यामुळे गुरांना चारा व संपूर्ण जीवसृष्टीला ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.कारण आज जंगल संपदा वाचविने गरजेचे आहे.कारण प्रत्येक झाडात,पानांत, फुलात व फळात आपल्याला खऱ्याअर्थाने विठ्ठलाचे दर्शन घडल्याचे दिसून येईल.त्यामुळे आता सर्वांनीच वृक्ष लागवड करून काय डोंगर, काय झाडी, काय हिरवळ गालीचा सम्द ओके करून प्रदूषणावर मात करायला हवी.जय हरी विठ्ठल! पांडुरंग हरी!
रमेश कृष्णराव लांजेवार,माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९