डफळापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण दि.२९ जून रोजी एकाच दिवशी येत आहे.महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आहे.
धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कोणतीही प्राणी हत्या करून कुर्बानी देणार नाही.या दिवशी धार्मिक महत्त्व असलेला कुर्बानीचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात येईल.असा ठराव मोहल्ला समितीच्या बैठकीत मुस्लिम बांधवांनी केला.
कुर्बानीचा कार्यक्रम धार्मिक परंपरेत सांगितल्याप्रमाणे आषाढी वारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी केला जाईल असे मुस्लिम बांधवांच्या वतीने बैठकीत ठरले आहे.यावेळी हाफिज अलाब्बक्ष नदाफ,इकबाल खतीब,अल्लाबक्ष खतीब,हुसेन मुजावर, बबन मकानदार, नौशाद तांबोळी,लक्यत जमखडींकर,हाजीअलम मणेर डफळापूर येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते.
एकमेकांचे धार्मिक सण आणि उत्सव सलोख्याने साजरे करण्याची परंपरा डफळापूर परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी जपली आहे.यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी या दिवसाचे महत्त्व जपत बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा एकमताने मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत निर्णय घेतला.गुरूवारी ईद दिवशी फक्त ईदची नमाज पठन होणार आहे.शुक्रवारी कुर्बानीचा कार्यक्रम होणार आहे.
मुस्लिम धर्मियांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले.यापुढील काळात एकमेकांचे सण उत्सव असेच सलोख्याने साजरे करूया असा निर्णय घेण्यात आला. “प्रत्येक समाज घटकाला आपले सण उत्सव धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्याचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायात असलेले आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी या दिवशी प्राणी हत्या टाळून कुर्बानीचा विधी न करण्याचा निर्णय घेतला. हा स्तुत्य उपक्रम आहे.आजपर्यंतचा इतिहास बघितला तर धार्मिक तेढ कुठेही नाही. या पुढील काळातही सर्वांनी अशाच पद्धतीने सामाजिक सलोखा जपणार आहोत,असेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.