बदलला कल, मराठी शाळेत चल
उमदी : जिल्हा परिषद शाळांपासून दुरावलेली विद्यार्थ्यांची पावले पुन्हा मागे वळू लागलीत. इंग्रजी शाळांतून मराठी शाळांत येण्याचा कल वाढला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून पालकांची मानसिकता बदललेली दिसते. गेल्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी माध्यमबदल केला. यंदा जून महिन्यातच अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशबदल झाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर पालकांनी विश्वास ठेवल्याचेच हे द्योतक आहे. दर वर्षी प्रवेश संख्या वाढतच आहे. कोरोना कालावधीनंतर मराठी शाळांकडे ओढा वाढल्याचे दिसते. यापूर्वीही माध्यमांतर होत होते, परंतु तीन वर्षांपासून संख्या वाढते आहे.
पूर्वी पाचवी किंवा आठवीच्या वर्गांत बदल होत. आता सर्वच वर्गांत इंग्रजी शाळांतून मराठी माध्यमांत प्रवेश होत आहेत. त्यातही पालक मुलींच्या तुलनेत मुलांची शाळा बदलत असल्याचे दिसते. सर्वच तालुक्यांत हे बदलाचे वारे आहे. मराठी माध्यमाच्या शाळांचाही दर्जा सुधारत आहे. नवोदय विद्यालयासाठी जिल्हा परिषदेचेच विद्यार्थी सर्वाधिक निवडले जातात. जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा या विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.जिल्हा परिषद, तसेच अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांत शालेय पोषणआहार, मोफत गणवेश, तसेच इतर सुविधा पुरविल्या जातात.शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात.