सांगली : जत पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार प्रशांत किसन गुरव यांच्या अपघाती मृत्यूनंतर ॲक्सिस बँकेने गुरव यांच्या पत्नीस अपघाती विमा योजनेतून एक कोटी रूपयांची मदत केली. यामुळे मृत गुरव यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ॲक्सिस बँकेकडे राज्य पोलिस दलातील कर्मचारी व अधिकारी यांची वेतन खाती गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. बँकेने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अपघाती विमा योजना सुरू केली आहे. यापूर्वी पोलिसाचा सेवेत असताना दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर अॅक्सिस बँकेतर्फे तीस लाख रूपयांची मदत केली जात होती. आता त्यामध्ये बँकेने एक कोटी रूपयांपर्यंत वाढ केली आहे. पोलिसाच्या अपघाती मृत्यूनंतर संबंधित कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी ही विमा योजना कार्यरत आहे. गतवर्षी जिल्हा पोलिस दलातील एका कर्मचार्याच्या मृत्यूनंतर कुटुंबास एक कोटी रुपयाची मदत बॅंकेने केली आहे.
जत पोलिस ठाण्यातील हजेरी मेजर प्रशांत गुरव यांचा २१ फेब्रुवारी २०२२ रोजी अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २० जुलै २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नी कल्पना गुरव व मुले सार्थक, संकल्प आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
श्री. गुरव यांच्या वारसांना ॲक्सिस बँकेतर्फे विमा योजनेतून एक कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याहस्ते कल्पना गुरव यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे सर्कल हेड सृष्टी नंदा, विभागीय अधिकारी रवींद्र चव्हाण, शाखाधिकारी अविनाश देसाई, उपशाखा अधिकारी श्रेयस मगदूम, सोनल शहा, वैभव पाटील, श्री. गुरव यांचे पुतणे ओमकार गुरव यावेळी उपस्थित होते.