जत : कितीही मोठ्या पदावर पोहचले तरी आपल्या गावच्या जन्मभूमिला व शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना कधीही विसरता कामा नये.त्यांचा नेहमी आदर राखला पाहिजे.कोणतही मोठे पद जरी मिळाले तरी हवेत न राहता पाय नेहमी जमिनीवर असायला पाहिजेत.नोकरी मिळाली तरी पैसा हे साध्य नसावे.सीए व एमपीएससी सारख्या कठीण परीक्षेत पास होणे हे सोपे नाही.आज ही तिन्ही मुले यशस्वी झाले हे कौतुकास्पद असल्याचे मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले.
सीए परीक्षेत जत येथील किशोरी शंकर मोरे,रोहित मोरे हे बहीण भाऊ उत्तीर्ण झाले.तर कोसारी येथील स्नेहल तानाजी चव्हाण हीची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.माजी सरपंच लक्ष्मणराव बोराडे यांनी शेगाव येथे आयोजित केलेल्या या तिघांच्या सत्कार समारंभात आमदार विलासराव जगताप बोलत होते.
यावेळी माजी आमदार जगताप पुढे म्हणाले की,संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे की कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक, तयाचा हरिख वाटे देवा.म्हणजे ज्यांच्या घरी सात्विक मुले जन्माला येतात त्याचा आनंद हा देवालाही होत असतो. तस या मुलांच्या आई वडिलांना किती आनंद झाला असेल हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आज आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असेल तर कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागेल.मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलचे माजी प्राचार्य वसंत बोराडे यांनी केले.यावेळी तिघा सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी दत्तात्रय बोराडे,कांचन बोराडे, शंकर मोरे, शकुंतला मोरे,राहुल मोरे, तानाजी चव्हाण सर व सौ लता चव्हाण ,प्रा.आबासाहेब सावंत, सरपंच सुनीता महादेव माने, उर्मिलाताई विलासराव जगताप, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, नारायणकाका सावंत,रवींद्र सावंत, उपसरपंच मंगेश सावंत, माजी सरपंच रवींद्र पाटील,धनंजय नरळे, डॉ.शिवाजी खिलारे डॉ.संजय नाईक डॉ.आण्णासाहेब कोडग, चेअरमन हरिश्चंद्र शिंदे, माजी उपसरपंच दत्ता निकम, व्हाईस चेअरमन कुमार बुरुटे, वसंत काशीद ,राजू नाईक ,विष्णु शिंदे, हनुमंत माने , समाधान माने, तानाजी हिरवे,सतीश नाईक तसेच बोराडे परिवार व कुटुंबिय आदी उपस्थित होते.