जत : जत तालुका सध्या दुष्काळात होरपळत आहे. दीड महिने उलटून गेले तरी पावसाचा पत्ता नाही. सध्या पावसाचे वातावरण आहे, पाऊसही पडेल याचा अर्थ दुष्काळ हटला असे होत नाही. भर पावसाळ्यात टँकर सुरु आहेत, भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे तेव्हा खा. संजयकाका पाटील, राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जतला दुष्काळ जाहीर करावा, सवलती द्याव्यात यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सिद्धू गुरव, भिमराया कांकणगी, मोसेन मणेर, श्याम मोरे, कुमार इंगोले वैभव जादव यांची प्रमुख उपस्थिती होती.जतचा दुष्काळ असो की कोरोना, एखाद्याचे घर जळाले असेल की नैसर्गिक आपत्ती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना कायम मदत नव्हे कर्तव्य म्हणून जतकरांच्या मदतीला धावून जाते. दुष्काळात राज्यात प्रथम खाजगी चारा छावणी काढली,कोरोना काळात तालुक्यातील ९० हुन अधिक गावात मदतीचा हात दिला. घरे जळाल्याच्या घटना घडल्या, अपघात झाले तेव्हा मानव मित्र संघटनेने काम केले असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, जतच्या पाण्यसाठीही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. ६५ गावात पाण्यासाठी जनजागृती मोहीम, पाणी परिषदा घेत तहसिलदार ते मंत्रालय, आमदार ते मुख्यमंत्री यांच्याकडे जतच्या पाण्यासाठी, म्हैसाळचे पाणी जतला मिळावे म्हणुन पाठपुरावा केला. संख ते मुंबई मंत्रालय पाण्यासाठी ऐतिहासिक पायी दिंडी काढली. याच पायीदिंडीमुळे आजपर्यत जतला पाणी देतो म्हणणाऱ्यांचे बिंब फुटले. जतसाठी द्यायला पाणीच नाही असे लेखी पत्र मानव मित्र संघटनेला संबंधित विभागाने दिले. त्यानंतर जतला सहा टीएमसी पाणी वारणेतून देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विस्तारित म्हैसाळ योजनेला गती आली. १९३० कोटींचा निधी या योजनेला मंजूर झाला आहे.
जतमध्ये सध्या दुःकाळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मानव मित्र संघटनेने थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेत दुष्काळात मदत करा अशी विनंती केल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले जतला म्हैसाळचे पाणी सोडण्यात आले आहे. लवकरच हे पाणी जतच्या शिवारात दाखल होईल. एवढ्यावर आमचे समाधान होणार नाही की आमचा दुष्काळ हटणार नाही. जतला दुष्काळ जाहीर करून त्याच्या सवलती दिल्या, टंचाईतून म्हैसाळचे पाणी सोडले तरच आम्ही वाचणार आहोत तेव्हा त्यासाठी खासदार व पालकमंत्री यांनी शासन दरबारी प्रयत्न करून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात जतला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी पूर्ण करून घ्यावी हीच जतकरांची अपेक्षा असल्याचे तुकाराम बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.