बेंगलोरमधून मुसक्या आवळल्या : तासगाव पोलिसांची कामगिरी
तासगाव : तासगाव तालुक्यातील कौलगे येथील खाजगी सावकार दत्तात्रय औताडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बेंगलोर येथून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कौलगे येथील कृषी सहाय्यक असलेला दत्तात्रय औताडे हा खासगी सावकारी करीत होता. अनेकांना त्याने भरमसाठ व्याजाने पैसे दिल्याच्या तक्रारी आहेत. व्याजाच्या धंद्यात त्याने मोठ्या प्रमाणावर ‘माया’ गोळा केल्याची चर्चा आहे. त्याच्या व्याजाच्या आकड्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. याबाबत त्याच्याविरोधात एकाने खासगी सावकाराची तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल होताच औताडे हा पळून गेला होता. गेले महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान औताडे याला तातडीने अटक करून त्याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, न्यायालयाने औताडे याचा जामीन फेटाळल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. तो कर्नाटकातील बेंगलोरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, हणमंत गवळी यांचे पथक बेंगलोरकडे रवाना झाले. तेथून औताडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.