जत : सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा,सातारा जिल्ह्यातील मान खटाव या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून आ.जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.
या सर्व भागात चारा डेपो शासन कधी सुरू करेल, टँकरचा पुरवठा बहुतेक ठिकाणी सुरू झाला आहे. पण ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ताबडतोब टँकर पुरवठा सुरू करण्यासाठी प्रांत स्तरावर अधिकार प्रदान करण्यात येतील का ? असा प्रश्न उपस्थित केला. विजेचे दर १ रुपया १६ पैशांपासून आता ५ रुपये २६ पैशांपर्यंत गेलेले आहेत त्याची बिले आलेली आहेत. वाढीव बिलांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृष्णा, वारणा, पंचगंगा साताऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहकारी लिफ्ट एरिगेशन स्कीम आहेत. त्यांनाही ही प्रचंड दरवाढ लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या योजना बंद पडतील अशी अवस्था आहे.
आ.पाटील यांनी मंत्री महोदयांना विनंती केली की,एका महिन्याच्या आत सुधारित सवलतीचे दर शासनाने जाहीर करावेत. आहेत तेवढेच दर ठेवावेत.५ रुपये २६ पैसे दरवाढ ही काही योग्य नाही.सहकारी क्षेत्राला प्राधान्य द्यायचं केंद्राचं धोरण दिसत आहे.त्यामुळे सहकारी क्षेत्रातल्या ज्या लिफ्ट एरिगेशन स्कीम आहेत त्यांना सवलतीच्या दराने ताबडतोबीने १५ दिवसात, एका महिन्यात, कधीही नवे दर लागू करून द्या, MSEB ला ते स्वीकारायला लावा अशीही आ.पाटील यांनी मागणी केली.