तासगावात महाविद्यालयीन तरुणींचा रस्ता रोको

0
3
तासगाव : कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या तासगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शुक्रवारी तासगाव – मणेराजुरी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल तासभर विद्यार्थी-विद्यार्थीनी रस्त्यावर ठिय्या मारुन बसले होते.
अखेर तासगाव आगार व्यवस्थापकांनी यापुढे अशी गैरसोय होणार नाही, असे लेखी आश्वासन देण्याची ग्वाही दिल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. विद्यार्थिनींच्या आक्रमक आंदोलनामुळे तासगाव आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कॉलेज दुपारी एक वाजता सुटते. यावेळेस शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनी मणेराजुरी रस्त्यावरील बस थांब्यावर उभे असतात. परंतू वेळेवरती बसेस येत नाहीत. काही वेळेस रिकाम्या बस येतात आणि निघून जातात. विद्यार्थ्यांनी हात करुनही चालक गाडी थांबवत नाहीत. असा प्रकार शुक्रवारी परत घडला.
विद्यार्थींनी तासगाव आगाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आक्रमकपणे बोलू लागल्या. सदर  प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अभिजित माळी, योगेवाडी येथील राजेश माने, वासुंबे ग्रामपंचायतचे सदस्य विकास मस्के, शीतल हाके यांच्यासह नागरिकही आंदोलनस्थळी दाखल झाले. आक्रमक झालेल्या विद्यार्थींनी कुणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
विद्यार्थिनींच्या रस्ता रोकोमुळे तासगाव कडून मणेराजुरीच्या दिशेने जाणारी आणि मणेराजुरी कडून तासगाव शहरात येणारी वाहतूक खोळंबली होती. मणेराजुरीच्या दिशेला जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सदर आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करुन तासगाव आगार व्यवस्थापक दयानंद पाटील तसेच वाहतूक निरीक्षक सूर्यकांत खरमाटे आंदोलन स्थळी दाखल झाले. तर सहायक पोलीस निरिक्षक नितीन केरामही दाखल झाले. पण आक्रमक विद्यार्थिनी कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. रोजच अशी गैरसोय होणार असेल तर आम्हाला पास तरी कशासाठी देता, असा सवाल त्यांनी विचारला.
आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी यापुढील काळात अशी गैरसोय होणार नाही अशी ग्वाही दिली. पण तोंडी आश्वासन नको, लेखी द्या, असा पवित्रा विद्यार्थीनींनी घेतला.आगार व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन देण्याची ग्वाही देताच आंदोलन थांबविण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here