अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या जोडीने शिक्षण हे सुद्धा प्रत्येक व्यक्ती ची महत्त्वाची गरज आहे 2012 सालच्या कायद्यानुसार शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील एकही मुल शाळेबाहेर राहणार नाही हे शिक्षणाचे ध्येय आहे. काळानुरूप शिक्षण शास्त्र विकसित झाले. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन पद्धती यामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. पूर्वीच्या काळाची धक धपटशाही व घोकंपट्टी यामधून हळूहळू विद्यार्थ्यांची सुटका होत गेली. विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मिळाले. घोकंपट्टी मागे पडून आकलनातून आनंददायी शिक्षण संकल्पना रुजू लागली. मुलांना शिकलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात जोडता येईल असे अभ्यासक्रमात महत्त्व दिले गेले.
सर्व शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून प्राथमिक शिक्षणाकडे बघितले जाते म्हणूनच वय वर्षे सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केलेले आहे. शिक्षणाचा उद्देश सक्षम नागरिक बनविणे हा आहे .भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आयोग व समित्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणावर भर दिला गेला. आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले गेले. गावोगावी मराठी शाळांची स्थापना झाली. वाड्यावस्त्यांवर देखील वस्ती शाळा, भाग शाळा सुरू झाल्या. सरकारी मराठी शाळा म्हणजे गावाचा अभिमान. गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक मूल शाळेत शिकत होते. म्हणूनच की काय शाळेची शाळेच्या इमारतीची देखील तेवढीच आत्मियतेने काळजी घेतली जात होती. गावातील मराठी शाळा या गावाचा जिव्हाळ्याचा विषय होता अगदी अलीकडे म्हणजे वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत शाळा या कौलारु होत्या. शाळेच्या भिंती विटा मातीच्या बनलेल्या होत्या. जमिनीवर बसकरपट्ट्या आंथरुन त्यावर विद्यार्थी बसत. शाळेची जमीन ही शेणा- मातीने सारवलेली असे.
मला आठवते, माझ्या नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या कालावधीत मी ज्या शाळेत होते ती शाळा छान टुमदार कौलारू होती. मोठ्या दगडी भिंती होत्या. लाकडी खिडक्या ,मोठ्या वर्ग खोल्या. शाळेसमोर प्रशस्त मैदान .विविध झाडांची दाट सावली. माझ्या वर्गाच्या भिंती मी, माझ्या विद्यार्थ्यांसोबत चुन्या ने रंगवल्या होत्या. केळीचे खांब मागील बाजूला जरा ठेचून त्याचा ब्रश सारखा वापर केला होता. प्रत्येक वर्गाची जमीन शेणामातीने सारवणे हा पंधरा दिवसातून एकदा करावयाचा उपक्रमच होता आमचा. मुले मुली अगदी आनंदाने गावातून शेण गोळा करून आणत. कधी मुले तर कधी मुली, यांच्यासोबत शेणाने वर्ग सारविण्याचा आनंद शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही सुखावणाराच होता. आम्ही सारवायला बसलो की मुले शेणात पाणी घालण्यात मदत करत. प्रत्येक मुलं स्वच्छता मोहिमेत आनंदाने सहभागी होई. आमच्या मुलांना काम का सांगताय म्हणून कधीच कुठले पालक भांडायला किंवा तक्रार घेऊन येत नसत. राष्ट्रीय सण म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी यांच्या तयारीसाठी झेंड्याचे पटांगण देखील शेणामातीने सारवले जाई.श्रमप्रतिष्ठा, श्रमदानाचे महत्त्व कृतीतून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले जाई. त्यात कधीच कुणाला कसला कमी पण वाटत नसे. वर्ग खोली, शाळा सजावट यात विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग असे.
कौटुंबिक वातावरणामुळे मुलांना शिकण्यातही आनंद मिळत असे. मराठी शाळेतील शिक्षण हे मातृभाषेतून असे. शिवाय करमणुकीच्या साधनांची फार रेलचेल नव्हती. त्यामुळे मुले पाठ्यपुस्तकांमध्ये रमत होते. धड्यांचे वाचन, कविता गायन, पाठांतर या गोष्टीत मुलांना आनंद मिळत होता. काही मुले स्वतः कवितांना चाली लावत आणि त्या गाऊनही दाखवत. इंग्रजीची ओळख ही सुरुवातीला पाचवीपासून होई. पुढे तो विषय पहिलीपासून भेटला येऊ लागला. शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खरोखरी वाव देणारे व्यासपीठच होते. शिक्षकांच्या मदतीने वाद्यांच्या तालात विद्यार्थ्यांनी गायलेल्या गाण्यांचे सादरीकरण होई. नाटके एकांकिका अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असे.
मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जाई. वर्गाच्या भिंती बोलक्या असत. शिक्षक स्वतः हाताने ते रंगवत. क्रीडांगणाचा पुरेपूर वापर होई. विविध खेळ व स्पर्धा हे विद्यार्थ्यांच्या करमणुकीचे प्रमुख साधन असे. मैदानी खेळावर अधिक भर दिला जाई. क्षेत्रभेट ,छोट्या सहली यांच्या माध्यमातून मुलांना परिसराची माहिती दिली जात असे. शाळेच्या मैदानातील काडीकचरा वेचणे. झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे या गोष्टींमधून शाळेविषयीची आपुलकी मुलांच्या मनात नकळत आपोआप रुजत असे. म्हणून शाळेचे नुकसान करण्यास कुणी धजावत नसे. व इतरांनाही करू देत नसत.
आजच्या मराठी शाळांचे रूपडे बदलले आहे. गेल्या वीस वर्षांपासून शाळेने कात टाकून नवीन रुप धारण केलेले आहे. मराठी शाळांना सेमी इंग्रजीचे गोंडस नामांकरण लाभले आहे . शाळेच्या मातीच्या इमारती जाऊन सिमेंटच्या प्लास्टरच्या दुमजली, बहुमजली इमारती लाभलेल्या शाळा दिसू लागल्या आहेत . आधुनिक तंत्रज्ञानाची शाळांनाही गोडी लागली .शाळेच्या सिमेंटच्या भिंती अधिक बोलक्या आणि रंगीबेरंगी झाल्या. शाळेचा वर्गाचा प्रत्येक कोपरा न कोपरा नटून-थटून गेला. भिंतीवर चित्र, विज्ञान रेखाटले गेले, प्रत्येक शिक्षक आपली कल्पकता व सृजनशीलतेचा अधिकाधिक वापर करून शाळेचा कायापालट करण्यासाठी धडपडू लागला आहे. मैदानात सुद्धा रंगसंगती साधत विविध खेळांची रचना केलेली दिसून येते. वर्गात तर कुठे मैदानावर निवांत जागी वाचन कोपरे उभारलेले दिसतात .जेथे विद्यार्थी स्वतःच्या आवडीची पुस्तके स्वतः घेऊन वाचत बसू शकतात. शालेय परिसरातील केवळ भिंतीच नाहीतर दरवाजे. खिडक्या, खांब, छत देखील बोलके झालेले आहेत. विविध माहिती पूर्ण चित्ररूपी ज्ञान रेखाटले आणि सजलेले आहेत. काही शाळांच्या भोवती असलेली परसबाग विविध झाडांनी, पालेभाज्या, फळ फुलांनी बहरलेली दिसते. नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव जसा सर्व क्षेत्रात वाढला तसा शिक्षण क्षेत्रातही वाढलेला आहे.
सेमी इंग्रजी रूप धारण केलेल्या मराठी शाळां डिजिटल झालेल्या आहेत . शाळेत विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप, कम्प्युटर यासारख्या माध्यमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती दिली जाते. समुद्र. डोंगर, चंद्र, तारे यासारख्या गोष्टीच्या चित्ररूपात किंवा कल्पनेत रंगविल्या जात होत्या. त्याच गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखवले जातात.
गुरुजींच्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये होणारे बदल हे देखील मोठे क्रांती घडवितांना दिसत आहेत. पूर्वीच्या पाटी पेन्सिली यांनाही आधुनिक रूप प्राप्त झालेले आहे. पाटी पेन्सिल ची जागा आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतलेली आहे. खडू फळा हे शिक्षकांच्या अध्यापनाचे प्रमुख साधन होते. त्यांची जागा आता ग्रीन बोर्ड ने घेतलेली आहे. स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन कार्य सुलभ झाले आहे. शिक्षक हे फक्त अध्यापकाच्या भूमिकेत न राहता सुलभकाची भूमिका पार पडताना दिसत आहेत. विद्यार्थी हा चिखलाचा गोळा आहे व त्याला हवा तसा आकार शिक्षक देऊ शकतात ही संकल्पना आता मागे पडली आहे. विद्यार्थी जेव्हा शाळेत पहिले पाऊल टाकते तेव्हा त्याच्याकडे स्वतःचे असे ज्ञान व अनुभवही असतात. व त्या आधारे ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना फक्त घोकंपट्टीचा आग्रह न धरता त्यांच्या बुद्धीला ,कृतीला, विचारांना चालना देणारी शिक्षण पद्धती शाळांमध्ये विकसित होताना दिसत आहे. अनुभवातून मिळणाऱ्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे गुरुजीची केवळ भूमिका ही केवळ ज्ञान देणारे न राहता सुलभक व दिशादर्शकाचे भूमिका पार पाडताना दिसत आहेत. पूर्वी शिक्षकांना गुरुजी व स्री शिक्षकांना बाई असे संबोधले जात असे. कालांतराने गुरुजींचे सर झाले व बाई या मॅडम झाल्या. आता सरळ सर्वच बाईंना विद्यार्थी टीचर असे म्हणतात. शिक्षक हे प्रेमळच असतात.
अति प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धतीत होते त्यात गुरूंच्या आश्रमात राहून विद्या ग्रहण केली जात असे. शिस्त, संयम ,नम्रता, धर्मपालन अशा अनेक नितीमूल्यांनी शिष्यांचा शारीरिक मानसिक विकास साधने हे ध्येय असे. पुढे शिक्षण पद्धतीत कालानुरुप अनेक बदल झाले. स्वतःच्या प्रगतीसाठी घेतले जाणारे शिक्षण हे अर्थार्जनाचे साधन बनले.
शिकविण्याच्या पद्धतीतील बदल- प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षक हा तंत्रस्नेही झालेला आहे. डिजिटल क्लासरूम मध्ये वापरण्यासाठी स्वतः व्हिडिओ निर्मिती तंत्र शिकू लागला आहे. युट्युब, स्मार्ट पीडीएफ, क्यूआर कोड या माध्यमातून आपले साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. विविध शैक्षणिक ॲप ,व्हिडिओ ,शैक्षणिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून ज्ञानार्जन केले जाते. टीव्ही, मोबाईल यासारखी साधने एज्युकेशन किट म्हणून वापरली जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची भाषा सुधारणे, नवीन भाषेचा परिचय करून देणे सोपे होत आहे. विविध राज्य, त्याची भाषा, राहणीमान सण ,उत्सवांमध्ये विविधता, देश-विदेशातील वेगळेपण ,संस्कृती तेथील शाळा. पोशाख, खाद्य संस्कृती, वन्यजीवन ,प्राणी जीवन अशा अनेक गोष्टीं ज्या पुस्तकांमधून माहित होत, ते आज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घेता येतो, तो आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शक्य होत आहे. आजचे गुरुजी व बाई देखील स्वतःला आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करण्यासाठी धडपडत आहेत . आपला विद्यार्थी मागे राहू नये यासाठी स्वतःचे शैक्षणिक व्हिडिओ ,शैक्षणिक ॲप,शैक्षणिक ब्लाँग तसेच वेबसाईट या माध्यमांचा ज्ञान देण्यासाठी प्रभावी वापर करताना दिसत आहेत . कोरोना काळाने शाळा व शिक्षण पद्धतीत फार मोठे क्रांती घडवून आणली. प्रत्यक्षात शिक्षक विद्यार्थी यांना एकमेकांच्या संपर्कात येणे शक्य नव्हते,शाळा अनिश्चित काळासाठी बंद झालेल्या होत्या , तेव्हा, ही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी व्हार्च्युअल क्लासरुम म्हणजेच ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिक्षकांचे काम सुरू होते. अनेक मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांना परदेशातील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधने देखील या व्हर्चुअल क्लासरूम द्वारे शक्य झाले. दुसऱ्या देशातील शाळा आपल्या वर्गात बसून प्रत्यक्ष बघण्याचा आनंद आजचा विद्यार्थी घेऊ शकला. थ्रीडी, फोर डी अँप च्या साह्याने जंगली प्राणी, ग्रहतारे प्रत्यक्षात वर्गात अभासी रूपात दाखवणे शक्य झाले. अशा या नवीन शिक्षण पद्धतीने मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली. परंतु सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेणे शक्य झाले नाही. भौतिक सुविधांच्या अभावामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहिले.
या आभासी शिक्षणाचे फायदे जसे आहेत तसे अनेक तोटेही आहेत . शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आत्मीयता कमी झाल्यासारखे वाटते . फक्त दिखाऊपणा वाढला की काय असे वाटते .हातातील गॅजेट सर्च इंजिनच्या साह्याने सर्व काही स्वतः शोधू ,शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज भासेल ना! विद्यार्थी व सुलभकाच्या भूमिकेत उरलेल्या शिक्षक यांच्यात गुरु शिष्य नाते उरेल का! दुसरीकडे आधुनिक साधनांपासून वंचित असलेल्या विद्यार्थी व आभासी शिक्षण पद्धती यांचा ही ताळमेळ कसा बसेल?
मराठी शाळेमध्ये ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती अवतरली तेव्हा त्याचा महाराष्ट्रभर प्रसार झाला. विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करून आनंददायी पद्धतीने शिक्षण घेऊ लागले. शिक्षणाची पद्धत आनंददायी झाली. मराठी शाळेमध्ये झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे शिक्षण पद्धती झपाट्याने बदलले. वाचन लेखन क्रिया गतिमान झाल्या विद्यार्थी केवळ श्रोता न राहता वक्ता बनला. प्रश्न विचारू लागला. शाळेत विद्यार्थी स्वतः शिकू लागला .आधुनिक साधने स्वतः हाताळू लागला. शिक्षक हे दिशादर्शकाच्या रूपात काम करू लागले.
समाज व पालक वर्ग, शिक्षकांच्या मदतीने शाळेचा कायापालट झाला. लोकसहभागातून शाळेचे रूप बदलू लागले. मराठी शाळा इंग्रजी शाळांच्या तोडीसतोड तयार होऊ लागल्या. थ्रीडी ॲनिमेशनच्या रूपात विद्यार्थ्यांना धडे कविता शिकण्यात मिळू लागले . विविध कार्टून हे विद्यार्थ्यांचे आवडते भाव विश्व. जेव्हा मुलांचे आवडते कार्टून पात्र त्यांना अभ्यास समजावून देतात तेव्हा मुले लक्षपूर्वक ते ग्रहण करतात. याचा फायदा घेत ॲनिमेशन रूपात पाठ्यपुस्तकाची निर्मिती हा देखील शिक्षण पद्धतीतील मोठा बदल आहे. सध्याच्या पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोड हे स्कॅनर ॲपच्या साह्याने स्कॅन करून पाठ्यपुस्तकातील घटक, कविता यांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना घरबसल्या बघायला मिळतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करत अनेक मराठी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवत ,प्रसिद्धी लाभलेल्या आहेत. जगभरातील शिक्षण तज्ञांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे समर्थन केलेले आहे. तरी देखील आपल्याकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ओढ ग्रामीण भागातील पालकांच्या मनावर गारुड निर्माण करून आहे. मराठी शाळेत वर्ग पहिलीपासून इंग्रजीचे धडे मिळत असतानाही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा पालकांचा अट्टाहास हा मराठी शाळेला मारत ठरत असतो. त्यांच्या पाल्यांसाठी देखील जाचक ठरतो. अनेकदा ही मुले ज्युनिअर केजी सिनियर केजी ते पहिले दुसरे पर्यंत इंग्रजी शाळेत टिकतात. पुढे जसे विषय वाढतात तसे या विद्यार्थ्यांची केविलवाणे अवस्था होऊन जाते. धड मातृभाषा भाषाही नाही व इंग्रजी नाही.
अभ्यासक्रम – अभ्यासक्रमाच्या दृष्टीने विचार केला तर आधीच्या परिक्षा पद्धती या स्मरणशक्ती वर आधारीत होत्या. काही ठाराविक विषयांनाच अतिमहत्व देणाऱ्या होत्या. त्यामुळे न कळत परिक्षेचे दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर निर्माण होई. मराठी शाळांमधील परिक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. मुक्तोक्तरी स्वरुपाच्या प्रश्नांचे स्वरुप विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे आहे. विद्यार्थी समजून घेऊन आपल्या भाषेत उत्तरे लिहू शकतात. पुस्तकी भाषेतील साचेबद्ध उत्तराचा दुराग्रह कमी झालेला आहे. म्हणून च विद्यार्थ्यांसाठी परिक्षा या देखील आनंददायी झालेल्या आहेत. कला ,संगीत .क्रिडा अशा अनेक घटकांमधील मुलांचा कल आवर्जून जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन शाळांमध्ये दिले जाते. ठाराविक विषयांच्या पेपरमधील गुणांकन हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापदंड आता राहिले नाही. पास -नापास, टक्केवारीचे दडपण कमी झालय. औपचारिक वर्गाचे कडक वातावरण जाऊन आनंददायी शैक्षणिक वातावरणात मुले शिक्षण घेत आहेत.
मराठी शाळांमधील हा सर्व बदल सुखावह असला, तरी देखील चारित्र्यसंपन्न , शिक्षणाप्रती जागृक विद्यार्थी घडवणे व ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कायम असावे. हाती सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाचा डोळसपणे योग्य वापर करण्याचीही शिकवण व योग्य दिशा मुलांना याच मराठी शाळांमधून मिळेल हा विश्वास वाटतो.
मनिषा चौधरी, नाशिक