केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत विविध प्रस्ताव सादर; तम्मनगौडा रविपाटील यांची माहिती
जत: जत तालुक्यातील तीन महत्त्वाच्या राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांना केंद्रीय मार्ग निधीमधून सुमारे 25 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय सदस्य तम्मनगौडा रवीपाटील यांनी याबाबत मागणी केली होती.
भाजपचे युवा नेते व जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समितीवर निवड झाली आहे. या समितीची पहिली बैठक आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीनंतर जत तालुक्यातील विविध रस्ते कामांचे प्रस्ताव रवीपाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.
तम्मनगौडा रवीपाटील त्यांनी जत तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी निधीची मागणी केली. त्यापैकी तीन रस्त्यांच्या कामांना केंद्रीय मंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामधून एक राज्यमार्ग व दोन प्रमुख जिल्हा मार्गांना २५ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.
जत तालुक्यामधून जाणाऱ्या तिन्ही महामार्गांची दुरुस्ती तसेच महामार्गावरील दुभाजक, फ्लायओव्हर, रस्त्याची अपूर्ण कामे तसेच जतसाठी रिंगरोड, शहरातील दुभाजक अशा विविध कामांची मागणी रवीपाटील यांनी या बैठकीत केली.
जत-उमदी-चडचण या राज्य मार्गास महामार्गाचा दर्जा देण्याची तसेच नागपूर ते गोवा हा ग्रीनफिल्ड महामार्ग जत तालुक्यामधून जावा यासाठीही रवीपाटील यांनी मागणी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जत तालुक्यातील रस्त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून जत तालुक्याला जोडणाऱ्या सर्व महामार्ग यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.