जत : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रमेश यशवंत खरात यांच्या टोळीस सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांनी पारित केला आहे.आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण व उत्सव शांततेत पार पडावेत, कोणताही अनुचित प्रकार घडु नये, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे, या पार्श्वभुमीवर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.
उमदी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख रमेश यशवंत खरात, (वय २४, रा. तिकोंडी, ता.जत)व टोळी सदस्यतानाजी आमसिद्धा करे,(वय २६,रा. तिकोंडी, ता. जत), महादेव ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे,(वय २०, रा. भिवर्गी, ता. जत), संभाजी बिराप्पा शेंडगे,(वय २२,रा. तिकोंडी, ता. जत) या टोळीविरुद्ध सन २०१९ ते २०२३ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, घरात घुसुन गर्दी मारामारी करुन मालमत्तेचे नुकसान करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करुन दुखापत करणे, बेकायदा बिगरपरवाना गौणखनिज चोरी करणे, महामारीच्या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून, जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती करुन, लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य पार पाडीत असताना त्यास अटकाव करुन त्याचेवर बळाचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करुन मारामारी करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्ते विरुद्धचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये उमदीचे तत्कालीन सहा.पोलीस निरिक्षक पंकज पवार पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, सुनिल साळुंखे चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांचेकडे चौकशी कामी पाठविला.त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख रमेश यशवंत खरात, तानाजी आमसिद्धा करे, महादेव ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे,संभाजी बिराप्पा शेंडगे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर यापुढे बारकाईने नजर ठेवुन ती नेस्तनाबुत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे.सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सिध्दाप्पा रुपनर,दिपक गट्टे,सहा.पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,छाया बाबर उमदी पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.