मिरज येथे राज्यातील पहिल्या कौशल्य प्रयोग शाळेचे (skil lab) कार्यान्वित

0

सांगली : आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून राज्य शासन सामान्य जनतेसाठी नवनवीन आरोग्य सेवा व योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभामुळे सामान्य माणसांचे जीवन अधिक निरोगी राहील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या कौशल्य प्रयोगशाळा (skil lab) व एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र डायलिसिस मशीनचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कौशल्य प्रयोगशाळेचा (skil lab) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असेही ते म्हणाले.

 

*आवश्यक साधन सामग्री देणार*

शासकीय रुग्णालयामधून सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या उपलब्ध व्हाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, यासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयास आवश्यक वैद्यकीय साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

Rate Card

*कावीळ रुग्णांसाठी डायलिसिस मशीन देणार*

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी डायलिसिस मशीन सुरू झाल्याने या रुग्णांची चांगली सोय झाली आहे. आता कावीळ रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. या बरोबरच ईसीजी व एमआरआय मशीनही देण्यात येतील. सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयातही सीटीस्कॅन मशीन व एमआरआय मशीन देण्यात येतील, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले.

 

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नवीन अत्याधुनिक व सर्व सुविधानी युक्त सुसज्ज असे मल्टिपर्पज हॉस्पिटल उभारण्याबाबत मंत्रालयात येत्या बुधवारी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे रुग्णालय उभे राहिल्यास भविष्यात शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जनतेला एकाच ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तसेच मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएससी नर्सिंग हा कोर्स सुरू करण्याबाबतही या बैठकीस चर्चा करून हा कोर्स सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे, असे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

 

जत तालुक्यातील समता अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना अन्नातून विषबाधा झालेल्या घटनेत आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी कौतुक केले.कौशल्य प्रयोगशाळा (skil lab) उद्घाटनानंतर पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे व उपस्थित मान्यवरांनी या प्रयोग शाळेची पाहणी केली. डॉ. दीपा शिर्के यांच्यासह अन्य उपस्थित डॉक्टरांनी कौशल्य प्रयोगशाळेबाबतची (skil lab) सविस्तर माहिती दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.