जयसिंगपूर: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात प्रथम क्रमांकावर आणण्यात योगदान दिल्याबद्दल संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवभारत टाइम्स स्क्रोल ऑफ ऑनर पुरस्कार २०२३ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. उद्योगपती घोडावत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात प्रथम क्रमांकावर आणण्यात मोठे योगदान दिल्याबद्दल उद्योग व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. त्यांनी एफएमसीजी, विंड टर्बाइन, रिअल इस्टेट, टेक्स्टाइल, एव्हिएशन, फ्लोरीकल्चर इत्यादी क्षेत्रात यशस्वी उद्योजकाची भूमिका बजावली आहे.या यशाबद्दल बोलताना घोडावत म्हणाले,’या ग्रुपने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादनावर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. यशाला कोणताच शॉर्टकट नाही. जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यश दूर नाही. उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक व देश प्रगती नक्कीच साधता येईल.
या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे’ असे सांगत त्यांनी या यशाचे श्रेय ग्रुपमधील प्रत्येक घटकाला दिले.घोडावत यांना आजवर शिक्षण, उद्योग, कोर्पोरेट व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.