कोल्हापूर : कोल्हापूरातील एका पतीने, चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या हत्याकांडानंतर आरोपी पती सचिन चंद्रशेखर राजपूत स्वतः सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.दरम्यान, सचिन राजपूत हा भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावलेला जवान होता, परंतु एका महिलेसोबतच्या गैरवर्तनामुळे त्याला सेनादलातून बडतर्फ करण्यात आले होते.
काल दुपारी, सचिन राजपूत आपल्या मोटरसायकलवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, जणू काही तो एका मोठ्या ओझ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता. त्याने थेट पोलिसांना सांगितले, “मी कोल्हापूरहून आलो आहे. मी माझ्या पत्नीवर चाकूने वार केले आहेत आणि तिला घरात बंद करून आलो आहे.सचिनच्या या कबुलीजबाबने पोलिसांनाही धक्का बसला.
या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची सत्यता पडताळण्यास सुरुवात केली. सचिनने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर पोलिसांनी ज्योतिबा डोंगराच्या कासारवाडी भागातील निर्जन स्थळाची तपासणी सुरू केली.अथक शोध मोहिमेनंतर त्यांना शुभांगी नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला, आणि ती सचिनची पत्नी असल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक माहितीनुसार, सचिन राजपूत आणि शुभांगी हे दोघे ज्योतिबा डोंगरावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी,त्यांच्यात वाद झाला असण्याची शक्यता आहे. सचिनने अचानक, शुभांगी बेसावध असताना तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने शुभांगीच्या चेहरा, गळा आणि पोटावर अनेक वार करून तिला ठार केले.या घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी आरोपी सचिनला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. कोल्हापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.