मुलाच्या भवितव्यासाठी उपोषणाची नौटंकी
तासगाव : राष्ट्रवादीचे नेते स्व. आर. आर. पाटील यांच्या घराण्यात गेल्या 45 वर्षापासून सत्ता आहे. स्वतः आर आर पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. सुमन पाटील याही गेल्या नऊ वर्षापासून आमदार आहेत. मात्र तरीही टेंभुच्या पाण्यासाठी त्यांना उपोषण करावे लागत आहे. हे गेल्या 45 वर्षातील त्यांचे हे अपयश आहे, अशी सडकून टीका खासदार संजय पाटील यांनी केली. मुलाच्या भवितव्यासाठी त्यांना उपोषणाची नौटंकी करावी लागत आहे, अशीही खरमरीत टीका खासदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
खासदार पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील सावळजसह आठ गावांचा टेंभू योजनेत लवकरच समावेश होत आहे. त्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे दिला आहे. येत्या दीड महिन्यात या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. हे समजताच आमदार सुमन पाटील यांनी येत्या 2 ऑक्टोबर पासून उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुळात त्यांच्या घरात गेल्या 45 वर्षापासून सत्ता आहे. या काळात त्यांना या योजनेत सावळजसह आठ गावांचा समावेश करता आला नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून आम्ही या गावांना पाणी देण्यासाठी झटत आहोत. आता सगळं अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आमदारांना जाग आली आहे.
यापूर्वी आमदार पुत्रांनी 2022 मध्येच या आठ गावांचा टेंभू योजनेत समावेश असल्याचे सांगितले होते. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी त्यांना आता उपोषणाची नौटंकी करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यांनी उपोषणाचे नाटक करू नये, अन्यथा सगळ्या बाबी आम्हास उघड कराव्या लागतील. आमदारांचे उपोषण म्हणजे गेल्या 45 वर्षातील अपयशाची कबुलीच आहे, असेही खासदार पाटील शेवटी म्हणाले.