जयसिंगपूर: कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर १५ ऑक्टोबर २०२३ पासून दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले. कोल्हापूर – मुंबई मार्गावर दैनंदिन विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी संजय घोडावत प्रयत्नशिल होते. त्याला आता यश आले आहे.
सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी विमान बेंगलोरहून कोल्हापूरकडे उड्डाण घेईल.दहा वाजून २० मिनिटाला हे विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात ४ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. तेच विमान ५ वाजून १० मिनिटांनी बेंगलोरला रवाना होईल.
याविषयी बोलताना संजय घोडावत म्हणाले, की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारी दैनंदिन विमानसेवा असावी, त्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर – मुंबई मार्गावर रोज विमानसेवा सुरू होत आहे. दैनंदिन विमानसेवा सुरू झाल्यामुळे, कोल्हापूरच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.