सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तसेच २६ ग्रामपंचायतीतील २९ रिक्त जागांकरिता व ३ थेट सरपंच पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर ग्रामपंचायतीमध्ये आचार संहिता लागू राहील. सदर आचारसंहिता केवळ संबंधित ग्रामपंचायत व त्याच्या सीमेलगतच्या गावामध्ये लागू राहील. तरी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून, कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यात यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील दि. 3 ऑक्टोबर 2023 च्या आदेशान्वये माहे जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या टक्केवारीच्या प्रमाणात सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ही ५० टक्केपेक्षा कमी असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्याही तालुक्यामध्ये संपूर्ण आचारसंहिता लागू राहणार नाही. केवळ संबंधित ग्रामपंचायत व त्याच्या सीमेलगतच्या गावामध्ये आचारसंहिता लागू राहील. सदरची आचारसंहिता ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये वा तालुक्यामध्ये व नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये लागू नसली, तरी ग्रामपंचायतीच्या मतदारावर प्रभाव पडेल, अशा प्रकारची कोणतीही कृती / भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही.
सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत पोलीस अधीक्षक सांगली व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना मा. निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. तरी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यात यावी, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.