प्राथमिक आरोग्य केंद्रांचा गच्याळ कारभार बदलणार का ?
सांगली : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रूग्णांवर तातडीने औषध उपचार करावेत. या रूग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही हेळसांड व हयगय होऊ नये, याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी. रूग्णांवरील उपचारांमध्ये हयगय व दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिले.
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयास प्रत्यक्ष भेट व आरोग्य व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत अनेक सोई सुविधांबरोबरच आवश्यक यंत्र सामग्री व निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रुग्णालयातील औषध भांडारास भेट देऊन उपलब्ध औषध साठ्याची माहिती घेतली. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा याची दक्षता घेण्याची सूचना करून आवश्यक औषधांची मागणी वेळीच करावी. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही. यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
साधनसामुग्री, मनुष्यबळाअभावी रूग्णांच्या उपचारात विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या भेटी प्रसंगी सांगितले.
शासकीय रुग्णालयांची नियमित स्वच्छता ठेवावी. त्याची दररोज एका अधिकाऱ्यामार्फत स्वच्छतेची तपासणी करावी, असे सूचित करून डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आवश्यकतेनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीबाबत कार्यवाही करून रीतसर प्रस्ताव सादर करावा. तसेच गरजेनुरूप करार तत्वावरील कर्मचाऱ्यांची आउट सोर्सिंग द्वारे सेवा घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करून घ्यावे. आवश्यक तेथे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, डॉ. राजा दयानिधी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. संबंधित नातेवाईकांनी दिलेल्या सूचना, सुधारणाबाबतचे मत विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे सांगून त्यांनी आजच्या बैठकीत दिलेल्या सूचनाचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी वेळोवेळी शासकीय रुग्णालयाना भेटी देणार असल्याचे सांगितले.