सांगली : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीमधून करण्यात येणारी कामे लोकोपयोगी, पारदर्शी व दर्जेदार करावीत. तसेच, काटेकोर नियोजन करून सर्व विभागप्रमुखांनी प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च करावा, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून ४०५ कोटी रूपये नियतव्यय मंजूर आहे. शासनाकडून अर्थसंकल्पित तरतुदीच्या ७० टक्के निधी प्राप्त झाला आहे. सप्टेंबर अखेर ८३ कोटी, ७७ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मंजूर निधी त्या-त्या विकास कामांवर विहित वेळेत खर्च झाला पाहिजे, याचे कटाक्षाने पालन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.