राष्ट्रीय महामार्ग 166 मुळे प्रगती आणि सामाजिक विकास | – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | शिर्डी येथील कार्यक्रमात सांगली ते बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

0
7
सांगली : राष्ट्रीय महामार्ग 166 मुळे संपूर्ण कोकण क्षेत्रासाठी दळणवळणाची सुविधा अधिक चांगली होईल. सांगली ते बोरगाव या टप्प्यामुळे परिसरातील उद्योगधंदे वाढीसह ऊस, हळद, द्राक्ष उत्पादकांनाही लाभ होईल. या महामार्गामुळे केवळ दळणवळणच नव्हे तर प्रगती आणि सामाजिक विकासाचा नवीन मार्ग निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
शिर्डी येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग 166 च्या सांगली ते बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. शिर्डी विमानतळाजवळ काकडी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सांगली ते बोरगाव या महामार्गाची लांबी 41.44 कि.मी. आहे. या टप्प्यात 14 लहान पूल, 3 ओव्हरब्रीज, 9 अंडरपास, 17 कि.मी. चा सर्व्हिस रोड, 1 बायपास व 28 प्रवासी शेड आहेत. या महामार्गाच्या माध्यमातून सांगली जिल्हा आधुनिक पायाभूत सुविधांसाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 166 च्या या टप्प्यामुळे कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार असून आर्थिक व औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here