सांगली : जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी करण्यात आले. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी, शिवसेना यासह सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.
यंदाच्या अवर्षण परिस्थितीचे खासगी कंपनीच्या सर्वेक्षण करण्यात आले. या कंपनीने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेऊन जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. मात्र कायम दुष्काळ असलेला जत तालुका वगळण्यात आला. याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले आहेत. जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करावे या मागणीसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी पाऊस कमी पडला असून तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेत. तरीही जतचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्यापासून प्रशासन जाणीवपूर्वक अंग काढून घेत आहे. जतचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये झालाच पाहिजे या मागणीसाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे लाक्षणिक उपोषण सुरु असून या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांकडून तसेच जत तालुक्यातल्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींकडून लक्षणीय प्रतिसाद मिळतोय हि आनंदाची गोष्ट आहे.
या लाक्षणिक उपोषणाला उस्फुर्त पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या उपस्थितीमुळे प्रशासनाला आपण आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला भाग पाडू व जतचा समावेश लवकरच दुष्काळी तालुक्यांमध्ये करून जतला न्याय मिळवून देऊ..!आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार नाही,असे यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.