सांगली : उत्तरप्रदेशमधील कानपूरमधून १५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपीला कानपूर पोलीसांनी रविवारी सांगली पोलिसांच्या मदतीने इस्लामपूर बसस्थानकावर अटक केली. त्याच्याकडून सोन्याचा टंच काढणारे यंत्र, संगणक असा ४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
महेश मस्के (रा. नागराळे ता. वाळवा) याने १ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील बजारिया कानपूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयूब युसुफ यांच्या कुटुंबियाकडून १५ तोळे सोने व १५ किलो चांदी विक्री करण्याचे निश्चि त केले होते. सराफी व्यापारी संतपराव लवटे यांच्याकडून शुद्ध सोने व चांदी काढून त्यांची विक्री करून देतो असे म्हणत सोने, चांदी घेऊन साथीदारांसह पोबारा केला होता.
तो महाराष्ट्रातच आश्रयाला येणार हे गृहित धरून उत्तर प्रदेश पोलीसांनी सांगली पोलीसांना याची माहिती दिली. तपासासाठी कानपूर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकही सांगलीत दाखल झाले. संशयित इस्लामपूर बस स्थानकात येणार असल्याची माहिती मिळताच संयुक्त कारवाई करीत त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १५ किलो चांदीचे लगड, सोन्याचे लगड, सोन्याचे टंच काढण्याचे यंत्र व संगणक यांसह १ लाख दोन हजारांची रोकड असा एकूण ७ लाखांचा मुद्देमाल मिळाला.