नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) यांनी के.डी.के. कॅालेज जवळ, व्यंकटेश नगर, गोरा कुंभार चौक नंदनवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणाच्या लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आले. आज भूमिपूजन करण्यात आलेले सर्व उड्डाणपुल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यक्षेत्रातील आहे.
यावेळी मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सर्वश्री आ.चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अॅड आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी महारेलच्या गतिशील कामाच्या पद्धतीचे कोडे उलगडले. ते म्हणाले की, आपण ही कंपनी मी मुख्यमंत्री असताना स्थापन केली आहे. शासकीय कामांमध्ये विशेषतः रेल्वेच्या कामांमध्ये लागणारा विलंब लक्षात घेऊन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यपूर्तता करण्यात या कंपनीचा नावलौकीक आहे. पूर्व नागपुरातील सर्व उड्डाणपुले लवकरात लवकर पूर्णत्वास येतील याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच आमदार कृष्णा खोपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पाचही उड्डाणपुल नियोजित वेळेत पूर्ण होतील, असे सांगितले.