प्रत्येक गावात , वाडी तांड्यावर ,जंगलात आढळणारा एक वृक्ष म्हणजे वड. ज्याला अक्षयवृक्ष असेही म्हणतात . वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. १९५० मध्ये वडाला भारतीय वृक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. हे झाड अतिशय थंड सावली देते. उन्हाळ्यात त्याच्या सावलीत बसण्याचा आनंद काही औरच. महाराष्ट्रातील असं एकही गाव नसेल ज्या गावात वटवृक्ष नसेल. अगदी शहरापासून ते वाडी, तांड्यावर, सुपीक जमिनी पासून ते डोंगर माथ्यावर हा वटवृक्ष आढळतोच. पान,फुल,फळ,खोडच काय पण मुळीसुध्दा उपयोगी आहे.वड, वटवृक्ष, फायकस बेंगालेन्सिस , बन्यान, न्यग्रोध अशीही नावे याची आहेत. हा आपल्या उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.पक्षी, प्राणी यांचा अधिवास अधिक आहे.
वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. रस्त्यांच्या दुतर्फा, शेताच्या कडेला, बागेमध्ये , मंदिराच्या परिसरांत, समाधिस्थानांलगत सावलीसाठी हा वृक्ष लावतात. पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे याचा बीजप्रसार होऊन खेड्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा, पडक्या इमारती, भिंतीमधील भेगा इ. अनेक ठिकाणी तो वाढताना दिसतो. कडक ऊन, थंडी व पाऊस यांचा त्यावर प्रतिकुल परिणाम होत नाही.
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमेचा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो.वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात.
वडामध्ये दाहक-विरोधी गुण आहेत जे सूज कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखी मध्ये याचा उपयोग होतो.वटवृक्षाच्या पानांमध्ये पाणी, बुटानॉल आणि क्लोरोफॉर्म असते. हे सर्व आजारांना प्रतिकारशक्ती वाढवते. मुळामध्ये मुरुमांवर उपचार करणारे असंख्य गुण आहेत. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल एजंट असतात जे तोंडातील जंतू नष्ट करतात. वटवृक्षाच्या मऊ मुळास स्क्रब करून तोंडाशी संबंधित अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. दात आणि हिरड्या निरोगी राहण्यासाठी यांचा उपयोग होतो.वडाच्या झाडाची साल आणि पाने एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर लावल्याने केस निरोगी होतात.
मधुमेह, नपुंसकता, केसांचे आजार, गर्भपात रोखणे, आगीने भाजले असल्यास , नाकातून रक्त येणे ,अधिक झोप लागणे , सर्दी, ताप, कंबरदुखी, स्वप्नदोष, कोड, गाठी, नासीर, मुळव्याध, खाजणे, दहा, डोकेदुखी, हृदयरोग, तोंड येणे, तळपायाला भेगा पडणे , जखम, उन्हाळी लागणे, उलटी होणे, दातदुखी अशा विविध प्रकारच्या आजारावर वटवृक्ष गुणकारी आहे. वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करत असत. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात.
अभय मिरजकर