शेगाव : जत तालुक्यातील वाळेखिडी,बेवनूर, गुळवंची,नवाळवाडी व सिंगनहळ्ळी या गावांचा टेंभू सुधारित योजनेत समावेश करण्यात आला आहे.नव्याने पाच गावांतील २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.पाण्यासाठी शासन,प्रशासन यांच्याकडे पाच गावांतील स्थानिक नेत्यांनी यांच्या माध्यमातून प्रयत्न
केला होता. त्या प्रयत्नाला यश आले.शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील वाळेखिंडी, बेवनूर,गुळवंची, नवाळवाडी व सिंगनहळ्ळी या गावांना म्हैसाळ योजनेतून म्हणावे तसे पाणी मिळत नसल्याने गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित होते.
या पाच गावांना टेंभू योजनेतून पाणी देणे शक्य असल्याचे टेंभू अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित टेंभू
योजनेला मान्यता दिली. पाच गावांचा समावेश टेंभू योजनेत झाला आहे.पाच गावांसाठी ०.५ टीएमसी पाणी
वापर होणार आहे. या गावांना टेंभूतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
त्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शासनाकडे रेटा लावला.त्यामुळे १०९ गावांचा टेंभू योजनेत समावेश झाला. ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे.त्यासाठी जलसंपदा विभागाने अतिरिक्त ८ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.
वाळेखिंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. शिंदे, माजी उपसभापती शिवाजी पाटील, प्रा. एन. के. हिप्परकर, बेवणूरचे तुकाराम नाईक, महादेव शिंदे, नवाळवाडीचे श्रीमंत सूर्यवंशी, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलता जाधव यांनी तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील,आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता.






