सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशन, वृत्तपत्रा विक्रेता एजंट बांधवांचा आधारस्तंभ

0
आज 26 जानेवारी 2024 रोजी सांगलीत सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशन चा जिल्हा मेळावा होत आहे त्यानिमित्ताने…..
 वृत्तपत्र म्हणजे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर सुद्धा सतत समाज जागृती करत सामाजिक प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी करत लोकशाही राज्य असणाऱ्या आपल्या देशातील राज्यकर्त्यांवरती वचक ठेवण्याचे काम वृत्तपत्रे करत आली. या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ते वृत्तपत्र विक्रेते. विविध प्रकारच्या बातम्या, विविध प्रकारची माहिती, जाहिराती असा माहितीचा खजाना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता अनेक वर्षांपासून करत आला आहे.
 सांगली जिल्ह्यात सुद्धा या वृत्तपत्र विक्री वितरण व्यवसायाला मोठी परंपरा आहे. त्याच सांगलीत आज 26 जानेवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते एजंट बंधू-भगिनींचा जिल्हा मेळावा होत आहे. राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, सांगली विधानसभेचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह शासकीय अधिकारी व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिखर संघटनेचे म्हणजे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्री व वितरण क्षेत्रामध्ये सांगलीकर व एकूणच महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांची असणारी योगदान नक्कीच पाहिले. वृत्तपत्र विक्रेता हा घटक गेली अनेक वर्ष थंडी, वारा, पाऊस,महापुर, दुष्काळ व कोरोना यासारख्या प्रत्येक संकटावर मात करीत आपला व्यवसाय करत आहे. आपली वृत्तपत्र वितरणाची जबाबदारी पार पाडत आहे. तसं पाहिलं तर हा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय एक कुटुंब चालेल इतकं सुद्धा उत्पन्न देऊ शकत नाही. मात्र तरीही सांगलीतील लिमये, दप्तरदार, माधवनगरचे पाटील बंधू, जिल्ह्यातील विटा येथील भंडारी बंधू अशी अनेक उदाहरणे आहेत जी दोन-तीन पिढ्यांपासून वृत्तपत्र विक्री व वितरणाचा व्यवसाय करत आहेत. जबाबदारी पार पाडत आहेत. आजही अनेक जिल्ह्यात सुमारे एक हजारहून अधिक कुटुंब या व्यवसायात आहेत.

 

साधारण 35 वर्षांपूर्वी सांगलीमध्ये या वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना संघटित करणं सुरू झाले. इचलकरंजीचे भाऊ सूर्यवंशी, कोल्हापूरची अण्णा पोतदार यांच्या सहकार्याने सांगलीत शंकर पाटील, यशवंत कुंभार. कुंडलचे अण्णा दौंडे, आदी ज्येष्ठांनी वृत्तपत्र विक्रेते -वितरक यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रातील तरुण पिढी पुढे येऊन प्रभाकर भोसले, डी एस पाटील, शिवानंद चौगुले, माधव पतंगे  सुभाष चौगुले अशा काही मंडळींनी वृत्तपत्र संघटनेचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी आपापल्या परीने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.  वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ करून देण्यात काही प्रमाणात यश आले. त्यानंतर मी विकास सूर्यवंशी, प्रदीप आसगावकर, संजय सडकर, मारुती नवलाई, सुरेश कांबळे, नागेश कोरे, नारायण माळी मिरजेतून रवींद्र धोंगडे, आप्पा बरगाले, श्री माने, प्रशांत जगताप तर सध्या सचिन चोपडे, दत्तात्रय सरगर, विशाल रासनकर, दरिबा बंडगर, अमोल साबळे  सागर घोरपडे, दीपक वाघमारे, बाळासाहेब पोरे, मिरजेतून नंदू पोवाडे, विनायक तांबोळकर, गणेश आवळे, सुभाष जाधव, रामा कुंभार, राजू पोटे, कुपवाड मधून देवानंद वसगडे आदी वृत्तपत्र विक्रेत्यांनी संघटनेचे कामकाज पुढे चालवले.
गेल्या पंचवीस वर्षात संघटनेचं मोठं यश!
 मी स्वतः साधारण 2000 साली सांगली शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा अध्यक्ष म्हणून वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करू लागलो. आज या गोष्टीला 25 वर्षे होत आली आहेत. या पंचवीस वर्षाचं सिंहावलोकन केलं असता संघटना म्हणून अनेक बाबतीत चांगलं काम उभारता आलं याचं समाधान आहे. यामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील ही एजंट बंधू-भगिनींचे मोठे सहकार्य लाभले. वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार तसेच वितरण-जाहीरात क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच सांगलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज मोठी मजल मारली आहे असं अभिमानाने सांगावे वाटते.

 

                                         वृत्तपत्र विक्रेता भवन वितरण, सेंटर मोठं आदर्श काम
 वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्र वितरण व इतर कार्यक्रमांसाठी स्वतःच सभागृह असावं हे स्वप्न 2009 साली जिल्ह्याचे नेते व तत्कालीन मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून साकार झालं. मदन भाऊंचेच समर्थक असणाऱ्या माजी महापौर व मिरजेचे नेते किशोर दादा जामदार यांच्या प्रयत्नातून सांगली बरोबरच मिरजेतही वृत्तपत्र विक्रेता भवन उभा राहिले. देशात पहिल्यांदाच सांगलीत व त्यानंतर लगेचच मिरजेत वृत्तपत्र विक्रेता भवन उभा राहणे हेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मोठे यश व अभिमानाची गोष्ट ठरली आहे. याशिवाय सांगली शहरात ज्या पद्धतीने वृत्तपत्र वितरणाचे काम एकाच ठिकाणी चालते, वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्र घेणे, पुरवण्या घालणे व इतर कामासाठी प्रशस्त व एकत्रित जागा मिळाली त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात इतकं मोठं सेंटर कुठेही नाही याचा सांगलीकर वृत्तपत्र विक्रेते म्हणून नक्कीच आम्हाला अभिमान आहे. हे यश एकट्या दुखट्याचे नसून हे संघटनेचे यश आहे.
                                          स्वतःची प्रगती साधत सामाजिक जपणारी संघटना
 गेल्या काही वर्षात आमच्या या सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील व देशातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती असो अथवा इतर संकट असो वृत्तपत्र विक्रेत्यांनी नेहमीच आपल्या परीने मदतीचा प्रयत्न केला आहे. अगदी दुष्काळी परिस्थितीमध्ये एका नाटकाचे आयोजन करून त्यातून मिळालेल्या उत्पन्न जत सारख्या दुष्काळी तालुक्यात देण्याचे काम या वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी केलं. सांगली मिरज कुपवाड शहरासह जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, संघटना यांनाही आमच्या ताकदीने नेहमीच मदत करण्याचे काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करीत असतो. अनेक सामाजिक उपक्रम, सामाजिक कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्या माध्यमातून बळ देण्याचे प्रयत्न ही संघटना नेहमीच करीत आहे याचाही अभिमान वाटतो.
                                                                वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आधार
Rate Card
      वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळावा यासाठी सतत विविध माध्यमातून प्रयत्न केला जात असतो. गेली काही वर्षे वृत्तपत्र विक्रेत्यांना दीपावली कीट देण्याचा उपक्रम या संघटनेने यशस्वी यशस्वीरित्या राबवला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबातील महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेऊन कुटुंबाचा मेळावा घेण्याचे ही उपक्रम अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून राबवत आहोत. जून- जुलैमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्या यशवंत गुणवंत मुलांचा सत्कार करणे, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना वहीचे वाटप करणे आदी उपक्रम राबवले जातात. याशिवाय ज्या ज्या वेळी वृत्तपत्र विक्रेता अडचणी येईल त्या त्यावेळी संघटना अशा विक्रेत्याच्या पाठीशी ठामपणे राहत असते.
                                     वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक पत व आर्थिक स्तर वाढवून देणारी संघटना
  वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी ही या संघटनेने सत्तेत यशस्वी योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रात पुण्यानंतर फार नव्हे पण समाधानकारक उत्पन्न मिळवून देण्याचं यश या संघटनेने मिळवले आहे. यासह विविध माध्यमातून समाजामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याची असणारी प्रतिमा सुधारणे, समाजामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याच्या बाबत सकारात्मक व आदराचे स्थान निर्माण करण्याचे काम केवळ संघटनेच्या ताकतीवर व एकजुटीवर आज शक्य झाले आहे. आज सांगली शहरात अथवा जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले जाते हे केवळ संघटनेचे यश आहे असे मी मानतो. या संघटनेला बळ देण्याचे काम प्रत्येक वृत्तपत्र विक्रेता एजंट करत आहे याबद्दलही अभिमान वाटतो.

 

                                           वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ, एका स्वप्नाच्या पूर्ततेची धडपड
वृत्तपत्र व्यवस्थापन व समाजातील विविध माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतानाच शासन दरबारीही वृत्तपत्र विक्रेता- एजंटांना न्याय मिळायला हवा, शासनाने सुद्धा आपल्याला काही सोई सुविधा द्यायला हव्यात यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. शासन, लोकप्रतिनिधी व वृत्तपत्रांकडून याला म्हणावा तेवढा फार जोर मिळाला नाही याची खंत आहे. इतक्या वर्षात वृत्तपत्र विक्रेता व वितरण करणाऱ्या या घटकाची शासनाकडून उपेक्षा झालेली आहे.सध्या मात्र त्यामध्ये बदल दिसू लागला आहे. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर काही योजनांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना लाभ देण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व विविध जिल्ह्यातील संघटनेच्या माध्यमातून आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख नेतृत्वात शासन दरबारी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा सुरू आहे. विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवरांची या प्रयत्नांना साथ मिळत आहे. याचे फळ लवकरात लवकर मिळावे व महाराष्ट्र राज्य सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वच घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीतत करावे अशी आग्रहाची विनंती आहे.
आपल्या या कामगार वर्गाला न्याय देण्याचा अधिकार ज्यांच्या हातात आहे ते कामगार मंत्री आपल्याच जिल्ह्यातील व आपल्या महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून कामगार मंत्री डॉ खाडे यांनी वृत्तपत्र विक्रेता व वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वच घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे. वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या या घटकांची राज्यातील संख्या सुमारे दहा लाखाच्या घरात आहे. सुमारे दहा लाख कुटुंबे या व्यवसायावरती अवलंबून आहेत. या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या दहा लाख कुटुंबांचं आयुष्यात स्थिरता आणण्याचे, त्यांना न्याय देण्याचे काम मंत्री डॉ खाडे करतील ही अपेक्षा आहे.
   धन्यवाद!

 

श्री विकास सूर्यवंशी 9011036419
  सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.