सामाजिक बांधिलकी जपणारे प्रयोगशील उद्योजक : रवींद्र प्रभुदेसाई 

0

तांब्या पितळेची भांडी लखलखीत करणारी शायनिंग पावडर तयार करून आणि ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ ही टॅगलाईन घेऊन उद्योगविश्वात पदार्पण केलेल्या पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज तीस वर्षांत आपला व्यापार संपूर्ण देशभरात पसरवला आहे. जगभरातील २० हुन अधिक देशांत पितांबरीची उत्पादने निर्यात केली जातात. वेगवेगळ्या नऊ डिव्हिजन्समध्ये काम करताना कंपनीने आज ८२ हुन अधीक दर्जेदार उत्पादने बाजारात आणली आहेत. पितापुत्राने लावलेल्या एका लहानशा रोपट्याचे आज डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर होतानाच्या प्रवासात दडली आहे ती पितांबरीच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची प्रयोगशीलता, जिद्द, उत्तम नियोजन, ग्राहक हिताला प्राधान्य देण्याची वृत्ती, दांडगा लोकसंपर्क आणि प्रचंड मेहेनत, एका छोट्याशा खोलीतून पाच हजारांच्या गुंतवणुकीतून सुरु झालेला पितांबरीचा व्यवसाय आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे, मराठी उद्योग जगतात श्री.रवींद्र प्रभुदेसाई हे नाव जसे आदराने आणि सन्मानाने घेतले जाते, तसे त्यांच्यातील दानशूर वृत्तीमुळे सामाजिक आणि आध्यत्मिक क्षेत्रातही  प्रभुदेसाई यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ४ फेब्रुवारी हा श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा जन्मदिन. यंदा ते वयाची ६१ वर्षे पूर्ण करत आहेत. प्रभुदेसाई यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांच्या काही गुणवैशिष्ट्यांची आणि त्यांनी कंपनीला घालून दिलेल्या आदर्शांची थोडक्यात ओळख करून घेऊया.

 

कोणताही व्यवसाय म्हटला की  त्यामध्ये ताण-तणाव, उतार चढाव, लाभ-नुकसान या सर्व बाबी आपसूकच येतात. ३० वर्षांच्या कार्यकाळात प्रभुदेसाईंसुद्धा यातुन गेले आहेत, मात्र त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या कर्मचारीवर्गावर कधी होऊ दिला नाही. अशाही स्थितीत त्यांची स्थिरता कधी ढळली नाही. याचे श्रेय ते त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांना देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक साधना करत असल्यामुळे कठीण काळातही आनंदी राहण्याचे त्यांना बळ मिळत असल्याचे ते सांगतात. ते करत असलेल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेमुळे त्यांचा चेहरा सदैव हसतमुख असतो. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत ते हसतमुखाने करतात. कंपनीच्या प्रत्येक युनिटची सुरुवात सकाळी सामूहिक प्रार्थनेने होते. जगनियंत्याच्या चरणी  शरणागत होऊन प्रार्थना केल्याने मिळणारी ऊर्जा घेऊनच प्रत्येक कर्मचारी दैनंदिन कामाची सुरुवात करतो.

 

समाजसेवेचा आणि देशभक्तीचा वारसा प्रभुदेसाई यांच्याकडे त्यांच्या वडिलांकडूनच आला आहे. लहानपणापासून राष्टीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांचे जाणे असल्याने समाजसेवेचे आणि देशसेवेचे बालकडू त्यांना लहानपणीच मिळाले आहे. आपल्या प्रत्येकावर देव, पितर, ऋषी आणि समाज अशी चार ऋणे असतात. त्यापैकी समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीने ते विविध सामाजिक संस्था, राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानासाठी झटणाऱ्या संघटना, उदयोन्मुख कलाकार, गरजू व्यक्ती, गतिमंद मुले यांना नियमितपणे दान देत असतात. मग ते दान  पैशाच्या स्वरूपात असो वा पितांबरीच्या गृहोपयोगी उत्पादनांच्या स्वरूपात. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यांना प्रायोजकत्व देऊनही ते सामाजिक बांधिलकी जपत असतात. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ते ठराविक रकमेचा धनादेश विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक संस्थांना, गोशाळांना आणि आश्रमांना  अर्पणस्वरूपात देतात.   कोरोनाकाळात स्वच्छता दूत, पोलीस कर्मचारी, रुग्णालये यांना पितांबरीचे सॅनिटायजर, मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पितांबरीच्या हेल्थ केअर डिव्हिजनची आयुर्वेदिक औषधे कंपनीच्या वतीने विनामूल्य वितरित करण्यात आली. आषाढी आणि कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरीची वारी पायी करत असतात. त्यांच्या सेवेसाठी पितांबरीचा चमू वारीमार्गात दरवर्षी कार्यरत असतो.

 

या  चमूतील  पितांबरीचे कर्मचारी  पितांबरीचे क्युअर ऑन हे वेदनाशामक आयुर्वेदिक तेल वारीतील वारकऱ्यांच्या पायांना लावून त्यांच्या पायांची मालिश करून देतात. ज्यामुळे वारकऱ्यांना वारीसाठी पुनश्च्य नव्याने मार्गरत होण्यासाठी स्फूर्ती मिळते. मागील अनेक वर्षे हा सेवाभावी उपक्रम कोणताही गाजावाजा न करता अविरतपणे सुरु आहे. पितांबरीत काम करणारा मग तो शिपाई असो वा स्वच्छता कर्मचारी त्याला कर्मचारी म्हणणे प्रभुदेसाई यांना आवडत नाही.  पितांबरीचा प्रत्येक कर्मचारी पितांबरी उद्योगसमूहाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपापलया परीने हातभार लावत असतो, या विचाराने ते कंपनीतील कर्मचाऱ्यांना ‘सहकारी’ म्हणून संबोधतात आणि इतरांनाही तसेच संबोधण्यास सांगतात.  पितांबरीतील सहकाऱ्यांच्या अडी-अडचणीत ते त्यांना आर्थिक साहाय्यही करतात, प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करतात त्यामुळे पितांबरीचा प्रत्येक सहकारी त्यांच्याकडे मालकाच्या भावनेने नव्हे, तर अन्नदाता पित्याच्या भावनेने पाहतो. आज कंपनीने १२०० हुन अधिक गरजवंतांना कंपनीत रोजगार दिला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी केवळ शासकीय सेवेतच दिसून येतात; मात्र अशाही काळात २० हुन अधिक वर्षे कार्यरत असलेली मोठी फळी केवळ पितांबरी या खासगी कंपनीतच पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी कंपनीत विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व विकास आदींचे अभ्यासवर्ग नियमितपणे घेतले जातात ज्याचा परिणाम म्हणून शिपाई पदावर नोकरीला लागलेले काही जण आज कंपनीत अधिकारीपदावर काम करत आहेत. कोरोनाकाळातही प्रभुदेसाई यांनी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाची तारीख कधी चुकवली  नाही. मालक आणि कर्मचारी यांचे आपुलकीचे आणि प्रेमाचे एक वेगळे नाते  पितांबरीत पाहायला मिळते.

 

Rate Card

पितांबरी म्हणजे गुणवत्ता हे समीकरण ठरलेले आहे. प्रभुदेसाई यांनी कंपनीच्या प्रत्येक उत्पादनात गुणवत्ता जपताना त्यापासून ग्राहकांना कोणताच त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. ही काळजी घेण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता पडताळण्यासाठी प्रभुदेसाई यांनी कंपनीचे स्वतंत्र ‘आर अँड डी’ युनिट उभारले असून त्याठिकाणी उत्पादनांची गुणवत्ता पडताळण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. प्रभुदेसाई यांची आधीपासूनच आयुर्वेदात अधिक रुची असल्याने त्यांनी आपल्या बहुतांश उत्पादनांच्या निर्मितीमध्ये आयुर्वेदाचा आधार घेतला आहे. केवळ व्यवसाय वाढवायचा म्हणून रसायनांचा अधिक वापर करून बाजारात आपले उत्पादन खपवणे हे त्यांना कधीच मान्य झाले नाही. कंपनीच्या हेल्थकेअर डिव्हिजन अंतर्गत बऱ्याच आजारांवर उपयुक्त आयुर्वेदिक औषधांची कंपनीने निर्मिती केली असून अनेक आजारांवर उपयुक्त अशा गोमूत्रापासून पावडर तयार करून त्यापासून वासरहित गोमूत्र प्लस कॅप्सूल बनवणारी पितांबरी ही पहिली कंपनी आहे. कंपनीच्या रसायन विरहित गुळ पावडरला आज देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मराठी माणसांनी नोकरीमध्ये अडकून न पडता लहान मोठा व्यवसाय करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रभुदेसाई वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.  ‘लघुउद्योग भारती’चे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून मराठी व्यावसायिकांच्या कल्याणासाठी ते नेहमीच झटत असतात. सॅटर्डे क्लब सारख्या उद्योजक संघटनेमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उद्योगश्री पुरस्कार, मदर इंडिया पुरस्कार, राष्ट्रीय उद्योग प्रतिभा पुरस्कार, दाजीकाकाका गाडगीळ उद्योगरत्न पुरस्कार, ज्वेल ऑफ टिसा, इंडस्ट्री मन ऑफ द इयर यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळाले आहेत. आज प्रभुदेसाई यांचा पुत्र आणि कन्या दोघेही व्यवसायात वडिलांना हातभार लावत आहेत. रवींद्र प्रभुदेसाईंवर घडलेले संस्कार आज त्यांच्या मुलांमध्ये तितक्याच प्रमाणात उतरलेले दिसून येतात. पितांबरी ही आपल्या मालकीची नसून कंपनीचे समस्त सहकारी हेच तिचे खरे मालक आहेत ही भावना त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये रुजलेली आहे. नव्याने उद्योग क्षेत्रात उतरणाऱ्या आणि उद्योगक्षेत्रात स्थिरस्थावर झालेल्या मराठी उद्योगपतींसाठी रवींद्र प्रभुदेसाई यांचे उदाहरण निश्चितच दिशादर्शक आहे.

जगन घाणेकरघाटकोपरमुंबई 

संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.