आ.विक्रमसिंह सावंत यांची माहिती : निविदा प्रक्रिया गतीने सुरू
जत : म्हैसाळ विस्तारित योजनेच्या पुढील कामाची निविदा ताबडतोब काढण्याच्या प्रक्रियेस गती आली असून,जलसंपदा विभागाच्या सचिवानी निविदा पुर्व मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.जत तालुक्यातील सिंचन योजनेपासून वचिंत असलेल्या कायम दुष्काळी ६७ गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम सध्या गतीने सुरू आहे.मात्र पहिल्या टप्यात मुख्य पाईपलाईनचे टेंडर निघाले असून पुढील टप्यातील तालुका अंतर्गत वितरण व्यवस्थेचे टेंडर निघाले नसल्याने शेतकऱ्यांकडून जत तालुक्यात विविध मार्गाचे आंदोलन सुरू आहेत.
दोन दिवसापुर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची जतचे आमदार विक्रमसिंह सावंत व माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम,आमदार पी.एन.पाटील यांच्यासह भेट घेतली.यावेळी जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या तालुका अंतर्गत वितरण व्यवस्थेच्या कामासाठी निधीची उपलब्धता व कामाची सुरुवात करणेसाठी विनंती केली होती.त्यांची दखल घेत तात्काळ महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे सचिव यांनी निविदा पूर्व मंजुरी दिलेली आहे.त्यानुसार ताबडतोब निविदा काढण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून लवकरचं निविदा काण्यात येणार आहे,असे मंत्री महोदयांनी सांगितले असल्याचे आ.सावंत यांनी सांगितले.त्यामुळे विस्तारित योजनेच्या पुढील कामास गती मिळणार असून जत तालुक्यातील पूर्व भागातील ६७ गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
जत तालुक्यातील प्रत्येक वंचित भागापर्यत पाणी पोहचविणे ही जबाबदारी असून मी तसे निवडणूकी पुर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना वचन दिले होते.त्यानुसार म्हैसाळचे पाणी जवळपास आले असून अजूनही म्हैसाळच्या आवर्तनातून गावांना देण्यात येत आहे.जेथे शक्य आहे तेथेही तात्पुर्ती सोय करून पाणी सोडण्यात येत आहे.जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी मी सतत संपर्कात आहे. सर्वात महत्वाची असणाऱ्या पुर्व भागातील वंचित गावांच्या म्हैसाळ विस्तारित योजनेच्या दुसऱ्या टप्यातील कामाची निविदा तातडीने काढावी यासाठी मी सतत संबधित मंत्रीमहोदय यांच्याकडे पाठपुरावा करत आहे,विधासभेच्या अधिवेशनातही यावर आवाज उठविला आहे.नुकत्याच झालेल्या एकदिवशीय आंदोलनानंतर या योजनेचे अंतर्गत वितरण व्यवस्थेच्या कामाचे निविदा तातडीने करण्याच्या सुचना संबंधित विभागांना मंत्रीमहोदयांनी दिल्या आहेत,त्यामुळे टेंडर प्रक्रिया लवकरचं पुर्ण होणार असल्याचेही आ.सावंत यांनी सांगितले.