सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे व जत तालुक्यातील तिकोंडी या दोन महसूल मंडळांमध्ये शासन निर्णय दि. 16 फेब्रुवारी 2024 अन्वये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करून मंजुरी दिलेल्या सवलतीच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्वरीत कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
तासगाव तालुक्यातील वायफळे व जत तालुक्यातील तिकोंडी या दोन महसूल मंडळांमध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या जमीन महसुलात सुट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालु विजबिलात 33.5 टक्के सुट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय यंत्रणाकरीता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत व आवश्यक निधी यंत्रणांना उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर, मिरज या चार तालुक्यामध्ये शासन निर्णय दि. 31 ऑक्टोबर 2023 अन्वये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये कवठेमहांकाळ, वाळवा, जत, तासगाव, पलूस, आटपाडी या तालुक्यातील 37 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू केल्या आहेत. या व्यतिरीक्त दि. 16 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये तासगाव तालुक्यातील वायफळे व जत तालुक्यातील तिकोंडी या दोन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू केल्या आहेत.