डेली सोपपेक्षा विनोदी कार्यक्रम आवडीने पाहणाऱ्या दर्शकांची संख्या अधिक असल्याने सध्या प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी विनोदी कार्यक्रम हमखास चालू आहे. या विनोदी कार्यक्रमांतून अनेकदा भगवे वस्त्र परिधान केलेल्या साधूला विनोदी पात्र म्हणून दाखवले जाते. या पात्राच्या तोंडी थुकरट संवाद दिले जातात. त्याला विकृत चाले करताना दाखवले जाते. आजतागायतच्या हिंदी आणि मराठी चित्रपटांचा अभ्यास केल्यास त्यामध्ये सुद्धा साधू किंवा महाराज यांचे पात्र नेहमी भोंदू आणि खलनायकाचा स्वरूपातच दाखवण्यात आले आहे. प्रमुख खलनायकाचे अध्यात्मिक सल्लागार किंवा गुरु म्हणून साधूच्या वेशातील पात्रांना दाखवण्यात येते. ही पात्रे आपल्या शिष्याला कधी चांगला मार्ग न दाखवता केवळ कुकर्मामध्ये साहाय्यभूत असलेले दाखवण्यात येते.
अनेक चित्रपटांतून भगव्या वेशातील रुद्राक्षाच्या माळा धारण केलेले साधू किंवा महाराज भोंदू, स्त्रीलंपट आणि वासनांधांच्या रूपात दाखवले जातात किंवा त्यांना बिनडोक विनोदी स्वरूपात तरी दाखवले जाते. भगवा रंग हा जसा वैराग्याचे आणि त्यागाचे प्रतिक आहे तसा तो शौर्याचेही प्रतीक आहे, म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पताका आणि ध्वज यांसाठी भगव्या रंगाची निवड केली होती. रुद्राक्षाच्या माळा तर साक्षात शिवाच्या गळ्यात पाहायला मिळतात. त्यामुळे शिवभक्तांना त्या पूजनीय आहेत. मोहमायेचा परित्याग करून ईशचिंतनामध्ये आपले उर्वरित अखंड आयुष्य समर्पित करणारे आणि जगाच्या कल्याणासाठी हिमालय आणि तत्सम निर्जन ठिकाणी वर्षोनुवर्षे ध्यानधारणा करणारे साधू संत हे या भारतभूमीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने यांचे विराट रूप आपल्याला पाहायला मिळते. साधूचा वेष धारण करून आपला स्वार्थ साधणारेही कैक असतीलही मात्र भगवे वस्त्र धारण करणारे सरसकट सर्वच साधू हे काही भोंदू नसतात, त्यामुळे चित्रपट, मालिका आणि हास्यविनोदाच्या कार्यक्रमांतून साधू संतांची उभी केली जात असलेली प्रतिमा मनाला वेदना देणारी आहे. चित्रपट, मालिका आणि विनोदी कार्यक्रमांतून साधू संतांच्या प्रतिमा वेळोवेळी मालिन केल्या जात असल्यामुळे सश्रद्ध भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. दारी भिक्षेच्या अथवा माधुकरी मागण्याच्या हेतूने आलेल्या साधुंकडे संशयास्पद रीतीने पाहिले जाऊ लागले आहे. लहान मुले या साधूंची टिंगलटवाळी करू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पालघर परिसरात अशाच प्रकारे संशयाने साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे साधूंची निदानालस्ती करणे योग्य नाही.
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०