जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकायचा विडा युती शासनाने उचलला असून २६.८६ कोटी रुपयांची आणखी एक पाणी योजना मंजूर केली असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तम्मनगौडा रविपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, जत तालुक्यातील अंकलगी तलावात पाणी सोडण्याच्या नवीन योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 26 कोटी 86 लाख रुपयांची ही योजना असून माडग्याळ व्हसपेठ व गुड्डापूर तलावात या योजनेतून थेट पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. याशिवाय मिरवाड व देवनाळ येथील वितरिका यांच्या कामाचा या योजनेत अंतर्भाव करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने त्याची निवीदा प्रसिद्ध केली आहे. अंकलगी तलावाच्या पाणी योजनेसाठी आपण अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे.
अंकलगी तलावातून तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावांचे टँकर भरले जातात. त्यामुळे त्या तलावात पाणी सोडले तर पूर्व भागातील अनेक गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ही योजना व्हावी यासाठी अंकलगी येथे सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार चिप्पलकट्टी , अध्यात्मिक व्यक्तिमत्व तुकाराम बाबा महाराज व शेतकऱ्यांनी प्राणांतिक उपोषण केले होते. त्यावेळी म्हैसाळ योजनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांना आपण अंकलगी योजनेसाठी खासबाब म्हणून मंजुरी देण्याची विनंती केली होती. शासनाने अवघ्या दोनच महिन्यात अंकलगी योजनेसाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
एकीकडे जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी असलेल्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटींची रुपये कामे सुरू झाली आहेत. त्याचबरोबर आता आणखी एक योजना मंजूर करून युती शासनाने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. युती शासनाच्या काळात जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा आम्ही चंग बांधला आहे.
अंकलगी योजनेच्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी खिल्ली उडवली. एकाने तर ही योजना झाली तर मी राजकारणातून संन्यास घेईन अशी पैज लावली आहे. मात्र आता त्यांनी खरोखरच त्यांनी संन्यास घेण्याची आवश्यकता आहे. जत तालुक्याच्या पाण्यावरून ज्यांनी आजपर्यंत केवळ राजकारण केले तेच जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत. आता जनतेने आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण हे ओळखण्याची गरज आहे. जत तालुक्यात आता स्वातंत्र्याची नवी पहाट सुरू झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाग्योदय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया रवी पाटील यांनी व्यक्त केले आहे.