भ्रष्टाचाराचे मूळ ‘कॉपी’ प्रथेत 

0

गेल्या महिन्यात ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. ‘काही विद्यार्थी मिळालेला वेळ अभ्यास करण्यात व्यतीत करण्याऐवजी कॉपी करण्यात वाया घालवतात. कॉपी करण्यामुळे कुणाचेही भले होत नाही’ या गोष्टीवर त्यांनी या सत्रात विशेष भर दिला. सध्या राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.  १ मार्चपासून राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरु होतील. शैक्षणिक जीवनात या दोन परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. नोकरीकरिता ‘बायोडेटा’ बनवताना त्यामध्ये दहावी आणि बारावीची टक्केवारी नमूद करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परीक्षेतील टक्केवारीनुसार माणसाच्या बौद्धिक क्षमतेची ‘बायोडेटा’ पाहणाऱ्याला कल्पना येते. शिवाय या दोन्ही परीक्षा नेहमीच्या शाळा आणि महाविद्यालयांत न होता या परीक्षांसाठी अन्य केंद्रात जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांवर अपरिचित वातावरणात परीक्षा देण्याचा ताणही असतो. या काळात समस्त परिक्षाकेंद्रात पोलीस शिपाई नियुक्त केलेले असतात, कॉपी करण्याच्या प्रथेवर आळा घालण्यासाठी शासनाचे भरारी पथक कार्यरत असते.

 

शाळेतील पर्यवेक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असते.  असे असतानाही या दोन्ही परीक्षांच्या कालावधीत ‘कॉपी करणे’ या प्रथेला भलताच ऊत आलेला असतो. कॉपी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणारे त्यांचे हित(?)चिंतक कॉपी करण्याच्या आणि कॉपी पुरवण्याच्या विविध क्लुप्त्या शोधून काढतात. यंदाच्या बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने विविध ठिकाणच्या कॉपीबहाद्दरांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावरून कॉपी पुरवण्याचा रोग राज्यात किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे याची कल्पना येते. काही ठिकाणी आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी पर्यवेक्षक शाळेतील मुलांना पुस्तके पुरवत असल्याचे उघड झाले आहे. काही ठिकाणी तर बोर्डाच्या परीक्षेच्या काळात ठराविक कमिशनच्या मोबदल्यात थेट बाकापर्यंत कॉपी पुरवणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. या मंडळींनी पोलिसांपासून शाळेच्या पर्यवेक्षकांनाही ‘मॅनेज’ केलेले असते. बोर्डाच्या परीक्षेकरिता एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याची सक्ती असताना परीक्षा केंद्रांमध्ये २ विद्यार्थ्यांना एकाच बाकावर बसवून एकमेकांच्या संगनमताने पेपर सोडवण्याची अनुमती देण्यात आली असल्याचे यंदा संभाजी नगरात निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी पेपर सोडवण्याचा कालावधी संपण्याच्या काही मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची, एकमेकांना उत्तरे विचारण्याची अनुमती दिली जाते. काही शाळांमध्ये शाळेच्या खिडक्यांबाहेर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्यांची जत्रा भरलेली असते. यांना पोलीसही हटकण्याची तसदी घेत नाहीत. काही विद्यार्थी तर कॉपी करण्यात अगदीच पटाईत असतात त्यांना इतका आत्मविश्वास असतो कि ते परीक्षेसाठी कधीही अभ्यास न करता मिळालेला संपूर्ण वेळ कॉपी तयार करण्यामध्ये घालवतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून काही ठिकाणी पर्यवेक्षक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगतात किंवा कॉपी करण्याची खुली अनुमती देतात.

 

मुलांचे वय हे संस्कारक्षम असते. लहान वयात होणारे संस्कारच त्यांचे भवितव्य ठरवत असतात. शालेय जीवनात परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होण्याची सवय जडलेले महाभाग पुढील आयुष्यातही यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’चा किंवा गैरमार्गाचा अवलंब करू पाहतात. पौगंडावस्थेत असतानाच कॉपी करण्याची सवय लागल्याने भविष्यात असे करण्यात काही चुकीचे आहे असेही त्यांना कधी वाटत नाही. कॉपी केल्यामुळे आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ मात्र पुढील व्यवहारिक जीवनात परीक्षेचे प्रसंग हे पदोपदी येणार आहेत त्यावेळी आपल्या बुद्धिमत्तेची आणि  विवेकाची कसोटी लागणार आहे, तेव्हा आपल्याला कोण साहाय्य करणार ? कॉपी करणे म्हणजे निव्वळ आपल्या स्वार्थासाठी गैरमार्गाचा अवलंब  करणे. कॉपी करणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे आणि नेटाने अभ्यास केला आहे त्यांच्यावर अन्याय करणे. कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. कॉपी करणे म्हणजे मेहनतीला डावलून शॉर्टकट शोधण्याची सवय अंगीकारणे . वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता आहे, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही म्हणून कॉपी सारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे ही अनैतिकता आहे. परीक्षेचे पेपर सोडवण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करण्याची सवय विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात भ्रष्टाचाराने आणि गैरमार्गाने धन कमावण्याची सवय लावते. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार माजलेला आहे. ज्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही असे क्षेत्र आज शोधूनही सापडणार आहे. विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांतील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणेही सध्या उघड होत आहेत. भ्रष्टाचाराला आवर घालणे हे सरकारसमोरील आज मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचाराचे मूळ हे कॉपी करण्याच्या प्रथेत दडलेले असल्याने कॉपी प्रथा देशभरातून उखडून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

गुन्हेगारी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे आणि उच्चशिक्षितांचे वाढते  प्रमाण लक्षात घेऊन शाळांमध्ये नीती आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणे मध्यंतरी अनिवार्य करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधत असला तरी मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येण्यासाठी शालेय जीवनात नीती आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणे अत्यंत महत्वाचे आहे. आजमितीला हा विषय शिकवण्याकरिता अनेक शाळांनी शिक्षकच नियुक्त केलेले नाहीत. बऱ्याच शाळांमध्ये या विषयाच्या तासिकेत विद्यार्थ्यांना अन्य विषय शिकवले जातात, एकूणच या विषयाला शाळांकडून दुय्यम स्थान देण्यात येत आहे. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि अनैतिक गोष्टींविषयी सजगता आली कि मुले कॉपीसारख्या कुप्रथेच्या आहारी जाणार नाहीत.

Rate Card

 

जगन घाणेकरघाटकोपरमुंबई 

संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.