फिरकीचा जादूगार शेन वॉर्न

0
 बरोबर दोन वर्षापूर्वी आजच्याच  दिवशी ( ४ मार्च २०२२ ) क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी आली आणि या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. ही बातमी होती फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न यांच्या निधनाची. शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाची बातमी क्रिकेट रसिक पचवू शकले नाही. अनेकांचा या बातमीवर विश्वास बसत नव्हता. शेन वॉर्न असा अकाली निघून गेल्याने क्रिकेट विश्वाला जबर धक्का बसला. शेन वॉर्न जाऊन आज दोन वर्ष  झाली तरी या धक्क्यातून क्रिकेट रसिक अजूनही सावरू शकले नाही. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी या महान गोलंदाजाने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्न हा केवळ ऑस्ट्रेलियाचाच नाही तर जगातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होता.  आपल्या फिरकीच्या तालावर त्याने जगातील सर्वच दिग्गज फलंदाजांना नाचवले. जवळपास वीस वर्ष त्याने आपल्या फिरकीच्या बळावर क्रिकेट विश्वावर राज्य केले.
१३ सप्टेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या फॉन्टरी गली येथे जन्मलेल्या शेन वॉर्नने जेंव्हा फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याला सर्वांनी वेड्यात काढले कारण ऑस्ट्रेलिया म्हणजे वेगवान गोलंदाजांची भूमी . खेळपट्ट्या वेगवान त्यामुळे तिथे त्याची फिरकी चालणार नाही असेच सर्वांचे मत होते. अनेकांनी त्याला फिरकी गोलंदाजी न करण्याचा सल्ला दिला मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले. सातत्याने चांगली गोलंदाजी केल्याने अखेर त्याला ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात प्रवेश मिळाला. १९९२ साली त्याने भारताविरुद्धच त्याने आपली पहिली कसोटी खेळली मात्र या कसोटीत त्याला विशेष काही करता आले नाही. भारताच्या फलंदाजांनी त्याची गोलंदाजी लीलिया खेळून काढली. याच कसोटीत भारताचा सलामीवीर रवी शास्त्रीने द्विशतक केले. पहिल्या कसोटीत विशेष काही करता न आल्याने त्याच्यावर टीकाही झाली. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होणार नाही असाही तर्क अनेकांनी काढला मात्र  त्याने हार मानली नाही. टिकाकारांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. त्याचे फळ त्याला लवकरच मिळाले. इंग्लंड विरुद्धच्या प्रतिष्ठेच्या एशेस मालिकेत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना सलो की पळो करून  सोडले. आपल्या फिरकीच्या बळावर त्याने ही मालिका ऑस्ट्रेलियाला एकहाती जिंकून दिली.
इंग्लंड फलंदाजांना शेन वॉर्नची फिरकी समजलीच नाही. इंग्लंड फलंदाजांना शेन वॉर्नने अक्षरशः मामा बनवले. याच मालिकेत शेन वॉर्नने असा चेंडू टाकला की ज्याने फलंदाजच नव्हे तर क्रिकेट विश्वच अचंबित झाले. शेन वॉर्नने इंग्लंडच्या माईक गाटिंगला ऑफ साईडला चेंडू टाकला. गाटिंगला वाटले की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याने तो वाईड ठरेल म्हणून  त्याने तो सोडून दिला मात्र चेंडूने अचानक १८० अंशात वळून चक्क गाटिंगचा लेग स्टंपवर धडकला. या चेंडूने केवळ फलंदाजच नव्हे तर क्रिकेट विश्वच हादरून गेले. असा चेंडू यापूर्वी क्रिकेट विश्वात कोणत्याची गोलंदाजाने टाकला नव्हता म्हणूनच या चेंडूला बॉल ऑफ सेंच्युरी असे म्हणतात. न भूतो न भविष्यती असा तो चेंडू होता. १९९३ साली शेन वॉर्नने हा स्वप्नवत चेंडू टाकला. आज इतक्या वर्षानंतरही हा चेंडू क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.
शेन वॉर्नची गोलंदाजीची शैली अनोखी होती. या अनोख्या शैलीनेच त्याने १४५ कसोटीत ७०८ बळी घेतले. त्यातील ४४८ बळी हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये घेतले. येथे एक लक्षात घ्यावे लागेल की या दोन्ही देशातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असतात. वेगवान खेळपट्ट्यांवर इतके बळी मिळवणे ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. त्याने १४५ कसोटीत खेळताना ३७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत तर तर कसोटीत १० किंवा १० पेक्षा अधिक बळी त्याने १० वेळा घेतले आहेत. इतकेच नाही तर त्याने १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेतले आहेत. १९९९ साली इंग्लंडमध्ये झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने शेन वॉर्नच्या फिरकीच्या बळावरच जिंकला होता.
Rate Card
शेन वॉर्नने जगभरातील दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवले. जगातील सर्वच देशात त्याने अप्रतिम कामगिरी करीत बळी मिळवले मात्र त्याला भारतात म्हणावे तसे यश मिळाले नाही. सचिन आणि वॉर्न यांचे क्रिकेट मैदानावरील द्वंद्व क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरायचे. सचिनला बाद करण्यासाठी वॉर्न जंग जंग पछडायचा मात्र त्याला त्यात यश मिळायचे नाही. शारजात  झालेल्या मालिकेत सचिनने वॉर्नची चांगलीच पिटाई केली तेंव्हा सचिन मला स्वप्नातही दिसतो अशी कबुली त्याने दिली होती. मैदानावर हे दोन महान खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकत असले तरी मैदानाबाहेर मात्र हे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. १९९० ते २०१० असे वीस वर्ष ऑस्ट्रेलियाने क्रिकेट विश्वावर एकहाती हुकूमत गाजवली त्यात शेन वॉर्नचा मोठा वाटा होता.
निवृत्तीनंतर शेन वॉर्नने समालोचन केले. २००८ साली आयपीएलचा पहिले सत्र पार पडले. या पहिल्या सत्रात शेन वॉर्न राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे या संघात शेन वॉर्न वगळता एकही स्टार खेळाडू नव्हता. या संघात तरुण आणि नवख्या खेळाडूंचा भरणा होता तरीही शेन वॉर्नने आपल्या चतुरस्त्र गोलंदाजीने आणि नेतृत्व गुणाने राजस्थान रॉयल्स ला विजेतेपद मिळवून दिले.शेन वॉर्नच्या मृत्यू नंतर क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली. त्याच्या सारखा महान फिरकी गोलंदाज पुन्हा होणार नाही. फिरकीचा जादूगार शेन वॉर्नला दुसऱ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.