सांगलीत 1 हजार कोटीहून अधिक गुंतवणकीचे सामंजस्य करार

0
जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक होणार रोजगारनिर्मिती
सांगली : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रीलियन डॉलर पर्यंत पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. यासाठी जास्तीत जास्त उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षित होणे आवश्यक आहे. यासाठी सांगली जिल्ह्याला 600 कोटी रूपये इतक्या गुंतवणूकीच्या रक्कमेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात 1 हजार कोटीहून अधिक गुंतवणक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी दर्शवली असून त्यासाठी शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी आज जिल्हा औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 60 सामंजस्य करार 1 हजार 35 कोटींचे झाले. यातून 3 हजार 190 इतकी रोजगारनिर्मिती जिल्ह्यात होणार आहे.

 

उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्यामार्फत डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, कृष्णा व्हॅली चेंबर्सचे सतिश मालू, डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संदीप सोले, मिरज असोसिएशनचे संजय खांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, सांगली जिल्ह्यात आयटी क्षेत्रासाठी वाव आहे. बऱ्याच सुविधा आपल्या जिल्ह्यात आहेत, परंतु जर विमानतळ जिल्ह्यात झाले तर आयटी क्षेत्रातील उद्योजकही जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याबाबत विचार करतील. परदेशात भेटी अंतर्गत तेथील लोकांनाही आपल्या जिल्ह्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविकात माहिती देताना पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक एस. जी. राजपूत म्हणाले, मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 जूनमध्ये प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने औद्योगिक गुंतवणूक परिषद प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्याचा प्रस्ताव पुढे आला.

 

त्याचाच एक भाग म्हणून 10 कोटीहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या 60 उद्योजकांबरोबर येत्या काही दिवसात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्याची काय क्षमता आहे व संधी काय आहेत याचा उहापोह या परिषदेच्या मार्फत करून जास्तीत जास्त गुंतवणूक जिल्ह्यात कशी करता येईल हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

 

औद्योगिक क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याचे भरीव योगदान आहे. मका प्रोसेस क्लस्टर करणारा सांगली जिल्हा राज्यामध्ये एकमेव आहे. बेदाण्याचे औद्योगिक क्लस्टर करणारा सांगली हा पहिला जिल्हा आहे. डिफेंस सेक्टरमध्ये गुंतवणूक कशी करता येईल ते पहावे. आयटी क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी जिल्ह्याने पुढाकार घ्यावा. उच्च तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, निर्यात कशी वाढवता येईल, औद्योगिक गुंतवणूक कशी वाढवता येईल याचे विचारमंथन या परिषदेमध्ये करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

उद्योजक सतिश मालू म्हणाले, उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे पाठबळ मिळाले तर खूप मोठा बदल होवून आर्थिक प्रगती होईल. व्यवसाय सुरू करताना मोठी मदतीची आवश्यकता आहे. शासनाने ज्या सवलती उद्योग सुरू करताना दिल्या जातात त्याच सवलती उद्योगामध्ये वाढ करतानाही द्याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

सांगली जिल्यासाठी प्रस्तावीत गुंतवणुकीचे उद्दिष्ट 600 कोटीचे असताना  सांगली जिल्ह्याने 1 हजार 35 कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. यातून 3 हजार 190 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मैग्नेटिक महाराष्ट्र 2024 ची पूर्वतयारी म्हणून ही औद्योगिक परिषद महत्त्वपुर्ण ठरणार आहे. 350 पेक्षा जास्त लोक या परिषदेसाठी उपस्थित होती. यात सामजंस्य करारासोबतच तज्ज्ञांची विविध मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

 

आपल्या जिल्ह्याचे एक जिल्हा एक उत्पादन (ODOP )हळद व बेदाणा तसेच इंजिनिअरिंग वस्तूंचे प्रदर्शन डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये भरवण्यात आले होते.यावेळी  जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार उपलब्ध करून दिलेल्या उद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन सदानंद गाडगीळ यांनी केले. आभार जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.