एरव्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आल्याच्या बतावण्या करणाऱ्या राजकारणी मंडळींची जनसेवेचे तळमळ आणि पक्षनिष्ठा किती तोलामोलाची आहे याची कल्पना निवडणूका जाहीर झाल्यावरच येते. नियोजित क्षेत्रात आपली मक्तेदारी आहे त्यामुळे सदर भागातील पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळायला हवी यासाठी ही मंडळी विशेष आग्रही असतात. अर्थात त्याच भागात उमेदवारीसाठी इच्छुक असणारे आणि तितक्याच ताकदीचे आणखी २-३ जण तरी प्रत्येक पक्षाकडे असतात. त्यांचाही आग्रह असतोच. अशावेळी कोणाला तिकीट द्यायचे असा गहन प्रश्न पक्षश्रेष्टींपुढे असतो. तिकीट एकालाच द्यायची असते; मात्र निवडणुकीच्या तोंडावर अन्य तुल्यबलांची नाराजीही ओढवून घेणे परवडणारे नसते त्यामुळे या सर्वांतून मार्ग काढताना भल्याभल्यांना घाम फुटतो, अखेर कोणाला तरी एकाला खुश करून इतरांना राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आदींचे गाजर दाखवून शांत करण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र हा प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होतोच असे नाही.
आपल्याला मुद्दामहून डावलले असा अर्थ काढून काही बलवान नेतेमंडळी ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत आपल्या पक्षनिष्ठेला तिलांजली देत सहज उमेदवारी मिळवून देणाऱ्या पक्षाचे पाईक होतात. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला अधिक महत्व देणारा कार्यकर्ता वर्गही आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून वेगळी वाट धरतो. हा सारा खेळ प्रत्येक निवडणुकांत आणि प्रत्येक राजकीय पक्षात घडत असतो. आपल्याला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पक्षाला एका तिकीटासाठी लाथाडणाऱ्या या नेतेमंडळींची निष्ठा नेमकी कशामध्ये दडली आहे याची ओळख यानिमित्ताने जनतेला होते. जी मंडळी आपल्याला मोठे करणाऱ्या पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत, ते जनतेशी कधीतरी प्रामाणिक राहू शकतात का ? अशा पक्षपाहुण्या उमेदवारांना जनतेने निवडणुकांतून धडा शिकवायला हवा !
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई