उमदी,संकेत टाइम्स : सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आघाडीत बिघाडी होत आहे.सांगली लोकसभा मतदार संघाची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही,अशी भूमिका कॉग्रेस नेत्यांनी घेतल्याने जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मैत्रीपूर्ण लढतीला काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची दुजोरा मिळत असल्याने विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.त्याचा मोठा परिणाम जत तालुक्याच्या राजकारणावर होणार हे निश्चित आहे.जत तालुक्यातील भाजपसह सर्वच पक्षात रुसवे फुगवे झालेले नेतेमंडळी विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करतील,अशी शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे.
भाजपने सांगली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना देवून आठवडा उलटला तरी जत तालुक्यात राजकीय वातावरण थंड आहे.दुसरीकडे शिवसेनेने (उबाठा) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच,काँग्रेस गोटात अस्वस्थता पसरली आहे.काँग्रेसचे नेत्यांनी दिल्ली गाठत दिल्लीच्या नेत्यांपुढे सांगलीची उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी मागणी केली.आज रविवार 31 मार्च रोजी श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार,उध्दव ठाकरे यांची बैठक संपन्न होणार असून सांगली उमेदवारीवर निश्चित तोडगा निघेल अशी आशा कॉंग्रेस नेत्यांना वाटते मात्र जर शिवसेनेने न ऐकल्यास काँग्रेस नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची प्रस्ताव काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर ठेवली आहे. आणि त्यास महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची दुजोरा मिळाल्याची खात्रीशीर बातमी आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी रद्द होणार की विशाल पाटील यांना काँग्रसचे उमेदवारी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
त्याचा परिणाम जत तालुक्यातील राजकारणावर होणार आहे.काँग्रसचे नेते विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केले तर जतची राजकीय समीकरण बदलणार आहेत.जतच्या भाजपा मधील मतभेद, गटतट चव्हाट्यावर आले आहेत. विशाल पाटील यांची काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तर जत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तालुक्यातील भाजपचे मातब्बर नेते विशाल पाटील यांचा प्रचार करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवारीवर होणार यात शंका नाही.