सध्याचे युग हे स्मार्ट फोन आणि इंटरनेटचे युग आहे. हातात स्मार्ट फोन नाही असा तरुण आज शोधूनही सापडणार नाही. इंटरनेटचा डाटा पॅकही परवडणारा असल्याने प्रतिदिन २ जीबी मिळणारा डाटा आजचा तरुण कामासाठी कमी आणि मनोरंजनासाठीच अधिक व्यय करताना दिसतो. ऑनलाईन गेम्स खेळण्यासोबतच आजच्या पिढीला वेड लागले आहे ते रिल्स पाहण्याचे. आजमितीला इंस्टाग्राम आणि युट्युबवर विविध विषयावरील कोट्यवधी रिल्सचे भांडार उपलब्ध आहे. विविध शासकीय योजनांची माहिती देणारे, तांत्रिक युक्त्या शिकवणारे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी सांगणारे, फिल्मी जगताची माहिती देणारे,क्रीडा क्षेत्रातील निवडक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग दाखवणारे, प्रतिष्ठित व्यक्तींच्या खासगी आयुष्यातील घडामोडींची माहिती देणारे, नृत्याचे प्रशिक्षण देणारे, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावरील घडामोडी टिपणारे, मधुचंद्राला कुठे जावे इथपासून तर कुटुंबासह सुट्टी साजरी करण्यास जाण्यासाठी विविध पर्यटन स्थळांची आणि धार्मिक स्थळांची माहिती देणारे, लाखो रिल्स आज सहज उपलब्ध आहेत.
यासोबतच चित्रपटातील एखाद्या गाण्यातील हुक स्टेपवर थिरकणारे तरुण तरुणींचे रिल्स, मालिका आणि चित्रपटांतील विनोदी प्रसंगांचे रिल्सही पुष्कळ प्रमाणात उपलब्ध आहेत. खास प्रौढांसाठी तयार करण्यात आलेले रिल्सही आज वयाची कोणतीच अट न बाळगता सहजपणे सर्वांना पाहता येतात. अशा रिल्समध्ये शिव्यांचा आणि अश्लील शब्दांचा मुक्तपणे वापर तर असतोच शिवाय अशा रिल्स बनवणाऱ्या तरुणी अंगप्रदर्शन करून रिल्सवर प्रतिदिन लाखो लाईक्स कमावत असतात. मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या, विनोदी मसाला असलेल्या, द्विअर्थी संवादांचा भरणा असलेल्या आणि अश्लील कंटेंट असलेल्या रिल्स पाहण्यात आजचा तरुण अधिक रुची दाखवत असल्याने अशा प्रकारच्या रिल्स बनवणाऱ्या युट्युबर्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठराविक सबस्क्राइबर झाल्यावर, रिल्सना ठराविक लाईक्स आणि शेअर्स मिळाल्यावर ते बनवणाऱ्यांना आर्थिक कमाईसुद्धा होत असल्याने रिल्स बनवणाऱ्यांची संख्या आज वारेमाप वाढली आहे. काहींना तर रिल्स बनवण्याचे जणू व्यसनच लागले आहे. शहरासारख्या ठिकाणी रेल्वे स्थानक असो वा बस स्टॅन्ड, भाजी मंडई असो वा शॉपिंग मॉल सर्वत्रच तरुण मुलामुलींची टोळी रिल्स बनवताना कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात दिसून येते.
अशाच एका तरुणीच्या रिल्स बनवण्याच्या नादाने तिच्या पतीचा जीव घेतल्याचे वृत्त नुकतेच वाचण्यात आले. रिल्स बनवून सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करण्याची पत्नीला लागलेली सवय काही केल्या सुटेना. पत्नीच्या रिल्सवर सोशल साईट्सवर प्रतिदिन येणाऱ्या अश्लील कमेंट्समुळे पती पुरता हैराण झाला होता. पतीने समजावूनही पत्नीने रिल्स करणे थांबवले नाही. रिल्सवरून पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्याने पत्नीने पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि ती माहेरी निघून गेली. पत्नीच्या रिल्सच्या नादाला आणि बदनामीला कंटाळून अखेर पतीने आत्महत्या केली. रिल्सच्या नादाने एका तरुणाचा नाहक बळी गेला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विवाहित तरुणी विविध गाण्यांवर अंगविक्षेप करत रिल्स बनवतात आणि त्या इंस्टाग्राम आणि युट्युबवर अपलोड करतात. अशा रिल्सवर येणाऱ्या आंबट शौकिनांच्या कमेंट्स वाचून या तरुणींच्या आई वडिलांना, जवळच्या जिवाभावाच्या नातेवाईकांना काय वाटत असेल, याचा विचार या तरुणी करणार आहेत का ? रिल्स बनवण्याच्या आहारी गेलेला मोठा वर्ग आज समाजात पाहायला मिळतो आहे. अशा तरुण-तरुणींना रिल्स बनवताना आपण कुठे वावरत आहोत, आजुबाजुने जाणारे लोक आपल्याकडे पाहून काय विचार करत असतील, त्यांपैकी आपल्या कोणी परिचयाचे किंवा नातेमंडळीतील आहेत का याचे जराही भान नसते किंबहुना त्याची त्यांना पर्वाही नसते. रिल्सच्या आहारी गेलेल्या या मंडळींना आपला हा नाद आपल्याला वास्तव जगतापासून दूर घेऊन जात आहे याचे जराही भान नसते. युट्युबवर रिल्स आणि व्हिडीओ बनवून लक्षावधी फॉलोअर्स आणि युजर्स गोळा केलेले अनेक युट्युबर्स आज युट्युबकडून प्रतिमास लाखो रुपये वेतन घेत आहेत. यापैकी कितीतरी जण साधे सातवीची परीक्षाही उत्तीर्ण झालेले नाहीत.
सध्याच्या युगात यशस्वी व्हायचे असेल, प्रसिद्धी मिळवायची असेल आणि पैसा कमवायचा असेल, तर त्यासाठी शिक्षण अनिवार्य नसून लोकांना आवडतील अशा रिल्स बनवता आले पाहिजे असा चुकीचा संदेश आजच्या तरुण पिढीवर बिंबु लागला आहे. आई बाबांनी ज्यांची कधी नावेही कुठे ऐकली अथवा वाचली नाहीत असे युट्यूबर्स आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत बनू लागले आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थी रिल्स बनवून ते अपलोड करू लागले आहेत. रिल्समध्ये सायकल्सवर , बाईक्सवर केलेले स्टंट पाहून ते स्वतः करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत आणि त्या नादात स्वतःचे हातपाय तोडून घेऊ लागले आहेत. तरुणांकडून पैसे उकलण्याचा उद्देशाने तयार केलेल्या अश्लील रिल्सच्या नदी लागून अनेक तरुण आज आर्थिक फसवणुकीला बळी पडू लागले आहेत. केवळ तरुण वर्गालाच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आज रिल्स पाहण्याचे वेड लागले आहे. रिल्स पाहण्यात तासन तास कसे निघून जातात याचा पत्ताही लागत नाही. आपणा सर्वांना प्रतिदिन खरोखरच मनोरंजनाची एव्हढी आवश्यकता आहे का ? मनोरंजनाच्या नादात आपला कितीतरी बहुमुल्य वेळ आपण असाच वाया घालवत असतो. विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आज सुखाची अनेक साधने आपल्या पायाशी लोळण घेत आहेत मात्र या सर्वांचा उपभोग घेत असताना आपण अनेक शारीरिक-मानसिक विकारांना आणि दोषांना निमंत्रण देत आहोत, स्वतःची हानी करून घेत आहोत हे आपल्या केव्हा लक्षात येणार ?
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०