गुरुकुल शिक्षणपद्धती काळाची गरज !

0
इंग्रजांच्या येण्याच्या आधीपासून भारतातील  ७० टक्केहून अधिक लोक सुशिक्षित म्हणजेच नीतिवान आणि सुसंस्कारित होते आणि त्यांना शिक्षण देणारे गुरुकुल गावागावांत होते, अशी नोंद तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी केली आहे. गुरुकुल शिक्षणपद्धती ही वैदिक काळापासून चालत आलेली आहे. गुरुकुलात राहून विद्यार्थी शिक्षण घेत असत. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासोबतच व्यक्तिमत्व विकासाचे आणि मूल्य शिक्षणाचे धडे या गुरुकुलात दिले जात असत. गुरुकुलात घडलेला विद्यार्थी हा सर्वांगाने आदर्श असाच असे. त्यामुळे सुसंस्कृतता हे भारताचे तत्कालीन प्रमुख वैशिष्ट्य होते. आपल्या प्रत्येकावर देव, ऋषी, पितर आणि समाज अशी चार ऋणे असतात आणि ती आपल्या जीवनकाळात फेडावीत असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.

 

गुरूकुलातून तयार होणारा प्रत्येक विद्यार्थी ही ऋणे फेडण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याच्यातील नीतिमत्ता अबाधित राहते.  इंग्रजांनी हीच मेख ओळखून गुरुकुल पद्धतीवर घाला घातला आणि मॅकॉलेप्रणित शिक्षण व्यवस्था भारतात रुजवली. देश स्वतंत्र होऊन आज ७६ वर्षे उलटली तरी आपण शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत इंग्रजांची गुलामगिरी त्यागलेली नाही. त्याची फळे आज आपल्याला भोगावी लागत आहेत. समाजाच्या ढासळत्या नीतिमत्तेचे परिणाम आज जागोजागी दिसत आहेत.

 

आपल्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देणे, इतरांना लुबाडणे लोकांना चुकीचे वाटत नाही, स्त्री अत्याचाराचे प्रमाण आज कमालीचे वाढले आहे, संपत्तीच्या लोभापायी आईवडिलांचा, भावंडांचा जीव घेतला जात आहे, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे. नात्यांमध्येच फसवणूक करून जागा, संपत्ती बळकावली जात आहे, दुर्बलांवर अन्याय केला जात आहे. या सर्वांसाठी जी नीतिमत्ता गरजेची आहे ती दुर्दैवाने शाळेत शिकवली जात नाही. आजमितीला शालेय अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण अनिवार्य असले, तरी या तासाला बहुतांश शाळांत दुय्यम महत्व दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आज काही राज्यांत अत्यल्प प्रमाणात गुरुकुल कार्यरत आहेत.

 

ज्यामध्ये वैदिक शिक्षणासोबत आताचा शालेय अभ्यासक्रम सुद्धा शिकवला जातो. या गुरुकुलात शिक्षण घेऊन विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर होत आहेत. समाजाच्या ढासळत्या नीतिमत्तेचा विचार करता गुरुकुल शिक्षण पद्धतीची आज नितांत आवश्यकता असून गावागावांत गुरुकुल सुरु करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा  !
 
– सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.