वाचनाविषयीची उदासीनता चिंताजनक !

0
12

जागतिक पुस्तक दिन नुकताच साजरा झाला. यनिमित्ताने अवांतर वाचनाविषयी हल्लीच्या पिढीमध्ये वाढत चाललेली उदासीनता याविषयी साधक बाधक चर्चा करण्यात आली. अवांतर वाचनाची सवय विद्यार्थी दशेत लावून घेणे गरजेचे आहे. अवांतर वाचनाने ज्ञान वाढते. हे ज्ञान पुढे व्यवहारिक जगात कुठेनाकुठे उपयोगी पडते. सध्याच्या पिढीमध्ये ज्ञानर्जनाची माध्यमे बदलली आहेत. वाढते डिजिटलायजेशन आणि अल्प दारात उपलब्ध होणारी इंटरनेटची सुविधा यांमुळे आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. या स्मार्ट फोनवर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर(X), युट्युब नावाच्या कथित ऑनलाईन युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या आहेत. या ज्ञानमाध्यमांकडून हल्लीच्या पिढीची ज्ञानाची भूक चांगलीच भागवली जाते.

 

 

त्यामुळे त्यापलीकडे जाऊन एखादे पुस्तक चाळावे किंवा कादंबरी अथवा ग्रंथ यांचे वाचन करावे आणि ज्ञानात भर घालावी अशी इच्छा बाळगणारे हल्ली औषधालाच सापडतील. हल्लीच्या पिढीमध्ये तर वाचनाचा सुद्धा कमालीचा कंटाळा दिसून येतो. अशी  मंडळी युट्युबच्या माध्यमारून ज्ञानार्जन करतात. मोठमोठ्या कादंबऱ्या, कथा, ग्रंथ यांसारखे साहित्य ध्वनिमाध्यमातून ऐकवणारे अँप्सही हल्ली स्मार्ट फोन्समधील प्ले स्टोर्समध्ये मिळू लागले आहेत. आजच्या तरुणांची वाचनाप्रतीची उदासीनता लक्षात घेता नवोदित लेखक आपल्या लिखाणाचे पुस्तक छापून ते प्रकाशित करण्याचे धाडस करताना हजारदा विचार करतात. पुस्तके वाचण्याच्या लोकांच्या उदासीनतेमुळे हल्ली मोठमोठ्या लेखकांची पुस्तकेही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ध्या किमतीत मिळू लागली आहेत.

 

पुस्तकांची दुकाने ओस पडल्याने अनेक पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांत जोडधंदा सुरु केला आहे. ग्रंथालये, वाचनालये यामध्ये लोकांची रेलचेल कमी झाल्याने दर्दी वाचकांना वाचनासाठी हवी असलेली शांतता आता नैसर्गिकरित्या मिळू लागली आहे. देशभरात सर्वाधिक ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. सरकारकडून मिळणाऱ्या निधीमधील अनियमितता आणि वाचकांचा अल्प प्रतिसाद यामुळे अनेक ग्रंथालयांना आज अखेरची घरघर लागली आहे. ही सारी लक्षणे म्हणजे धोक्याची घंटा असून भावी पिढीच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची आवड रुजवणे अत्यंत गरजेचे झाले आहे आणि त्यासाठी शाळा महाविद्यालयांतून प्रयत्न होणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून नियमित  अभ्यासक्रमासह मुलांची बौद्धिक भूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. ही भूक भागवण्यासाठी त्यांच्यात वाचनाविषयी रुची निर्माण करायला हवी ! 

 
– सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here